झुंज सिंधुदुर्ग किल्ल्याची...

प्रशांत हिंदळेकर
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. येथीलच नाही तर जिल्ह्याच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या या किल्ल्याची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. या अनुषंगाने किल्ल्याचे इतिहास, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व, किल्ल्याची दुरवस्था, स्थानिकांचे सुरू असलेले प्रयत्न यांचा आढावा घेणारी ही मालिका...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. येथीलच नाही तर जिल्ह्याच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या या किल्ल्याची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. शिवप्रेमींकडून सातत्याने झालेल्या पाठपुराव्यातून पुरातत्त्व विभागाकडून काही प्रमाणात डागडुजी केली जात आहे; मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. या अनुषंगाने किल्ल्याचे इतिहास, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व, किल्ल्याची दुरवस्था, स्थानिकांचे सुरू असलेले प्रयत्न यांचा आढावा घेणारी ही मालिका...

मालवण - येथील समुद्रातील कुरटे बेटावर साडेतीनशे वर्षापूर्वी साकारण्यात आलेल्या किल्ले सिंधुदुर्गला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सागरी लाटांशी झुंज देत उभा असलेला हा किल्ले सिंधुदुर्ग जिल्हावासीयांचा, देश-विदेशातील पर्यटकांचा प्रेरणास्थान ठरत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात साकारलेला हा किल्ला हा वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याने गेल्या काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. किल्ल्याची होत असलेली पडझड पाहता हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना व्हायला हव्यात.

येथील समुद्रातील कुरटे बेटावरील सुमारे ४८ एकर परिसरात सिंधुदुर्ग किल्ला साकारला आहे. किल्ल्याच्या उभारणीस २५ नोव्हेंबर १६६४ ला सुरवात झाली. सलग तीन वर्षे हे काम चालू होते. या किल्ल्याची तटबंदी २ मैल (३ किलोमीटर) आहे. तटाच्या भिंतीची उंची सुमारे ३० फूट (९. १ मीटर) तर रुंदी १२ फूट (३.७ मीटर) आहे. सागरी लाटांपासून तसेच परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी या प्रचंड भिंती उभारलेल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर दगडी पायऱ्यांनी नगारखान्यात प्रवेश करता येतो. नगारखान्याच्या डाव्या बाजूला दोन घुमट्या आहेत. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना त्याची पाहणी करण्यासाठी शिवाजी महाराज आले होते.

त्यावेळी चुन्याच्या ओल्या गिलव्यावरून ते चालत गेले. महाराजांच्या डाव्या पायाच्या व उजव्या हाताचा ठसा तेथे उमटला. आज त्या जागेवर घुमट्या बांधून त्याचे जतन केले आहे. इथून पुढे गडाच्या तटबंदीवरून फेरफटका मारता येतो. भल्यामोठ्या बुरूजांचे व नागमोडी तटबंदीचे निरीक्षण करीत चालताना या किल्ल्याची भव्यता पाहता येते. किल्ल्यावर एकूण ४२ बुरूज आहेत. तटामध्ये पहारेकऱ्यांसाठी शौचकप आहेत. एका बुरूजाच्या बाजूने बाहेर समुद्राकडे जाण्यासाठी दरवाजा आहे. तेथील पळण (छोटा दरवाजा) आपले लक्ष वेधून घेते. या भागास ‘राणीच्या वेळा’ म्हणून ओळखले जाते. राणी जलक्रीडा करण्यासाठी याचा वापर करीत असल्याची नोंद इतिहासात आहे. 

किल्ल्यावर महाराष्ट्रातील एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराजेश्‍वर मंदिर आहे. हे मंदिर राजाराम महाराजांनी १६९५ मध्ये साकारले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली शिवछत्रपतींची मूर्ती आहे. दररोज भल्या पहाटे मूर्तीला अभिषेक घातला जातो. त्यानंतर चांदीचा मुखवटा, जिरेटोप आणि वस्त्रे चढविली जातात. समोर एक तलवार ठेवण्यात येते. या मंदिराच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. पुढे भवानी मातेचे मंदिर आहे. किल्ल्यात दहीबाव, साखरबाव, दुधबाव अशा नावांच्या विहिरी आजही अस्तित्वात आहेत. वाड्याचे पडके अवशेष पाहत निशाणकाठी बुरूजावर गेल्यावर तेथून गडाची तटबंदी तसेच गडाचा विस्तृत प्रदेश नजरेस पडतो.

अरबी समुद्रातील कुरटे बेटावर साकारण्यात आलेला सिंधुदुर्ग किल्ला हा वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. १६६४ मध्ये किल्ल्याच्या बांधकामास सुरवात झाली. या किल्ल्याच्या जागेची पाहणी व गडाच्या बांधणीचे काम महाराजांचे निष्ठावंत सेनापती हिरोजी इंदुलकर या कुशल बांधकामवीराने स्थानिक कोळीबांधवांच्या मदतीने पूर्ण केले. या बांधणीसाठी सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागला. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना शत्रूंकडून बांधकामात व्यत्यय येऊ नये यासाठी महाराजांनी सुमारे चार ते पाच हजार मावळ्यांची फौज तैनात केली होती. चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १५८९ म्हणजे २९ मार्च १६६७ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी महाराजांना तोफांची सलामी देण्यात आली तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये साखर वाटण्यात आली. या गडाच्या निर्मितीमुळे महाराजांनी पश्‍चिम सागरवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. बुरूजांवर चढण्यास-उतरण्यासाठी ४५ दगडी जिने बांधण्यात आले आहेत.

महाराज आपल्या स्वराज्याचे प्रस्थ कोकणात पसरवीत होते. त्यावेळी त्यांनी सागरी शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी भूदलाबरोबर जलदलाचे व सागरी किल्ले निर्माण करण्याचे ठरविले त्यासाठी त्यांनी आरमार व किल्ले सिंधुदुर्गची निर्मिती केली. खुद्द शिवाजी महाराजांनी या गडाची पायाभरणीची मुहूर्तमेढ रोवली. दांडी येथील मोरयाचा धोंडा याठिकाणी या किल्ल्याचा पायाभरणी सोहळा महाराजांच्या उपस्थितीत पार पडला. हा किल्ला बांधण्यासाठी १ कोटी होन खर्च झाले. शिशाचा वापर करून हा किल्ला बांधण्यात आला. तटबंदीच्या खाली वापरलेल्या शिशाच्या कामासाठीच ८० हजार होणा एवढा खर्च आला. त्यामुळेच हा किल्ला सुमारे साडे तीनशेहून अधिक वर्षे सागरी लाटांची झुंज देत उभा आहे. ज्या कोळी बांधवांनी किल्ल्यासाठी जागा शोधून काढली त्यांना महाराजांनी गावे इनामात दिली. 

किल्ल्याच्या सुरवातीस वक्राकार आकाराच्या तटबंदीतून आत गेल्यावर आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. हा दरवाजा शिवकालीन दुर्गरचनेचा गोमुख दरवाजा आहे. महादरवाज्यात आपल्याला एक भग्नावस्थेतील तोफ पाहता येते. दरवाजावर नगारखाना आहे दरवाजासमोर एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे त्यात श्री गणेशाचीही मूर्ती आहे. हा दरवाजा आजही तितकाच मजबूत व व्यवस्थित आहे. महादरवाज्यातून आत गेल्यावर पश्‍चिम दिशेला जरीमरी देवीचे छोटेखानी मंदिर दिसते. त्यावर एक शिलालेख आहे ज्यात १८८१ मध्ये हे मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. आतमध्ये पादुकांची एक मूर्ती आहे. 

सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्रात असून या किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या खोल अशा विहिरी आहेत. या विहिरींना दूध बाव, दही बाव व साखर बाव म्हणून ओळखले जाते. या विहिरींचे वैशिष्ट्य म्हणजे चहूबाजूने समुद्राचे खारे पाणी असताना या विहिरींचे पाणी गोड आहे. प्रत्येक विहिरीला चौकोनी आकाराची तटबंदी आहे. या विहिरींचा वापर गडावरील लोक पिण्याच्या पाण्यासाठी करत. दही बाव व साखर बाव जवळ जवळ आहे. दूध बाव राजवाड्याच्या अवशेषांजवळ आहे.

भवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे त्यामुळे महाराजांनी बांधलेल्या जवळपास सर्वच किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर दिसून येते. या गडावरील भवानी मातेचे उजव्या हातात त्रिशूळ व डाव्या हातात तलवार असलेली पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. तिचे मंदिर कौलारू आहे, असा हा किल्ला आता पडझडीमुळे संकटात सापडला आहे. त्याच्या जतनासाठी आवाज उठवूनही शासनाने दुर्लक्ष केले. हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे गरजेचे बनले आहे.

अविस्मरणीय दर्शन...
सिंधुदुर्ग हा किल्ला अतिशय सुंदर व नयनरम्य ठिकाणी साकारला आहे. येथील किनारपट्टीवरून होडीतून या किल्ल्याकडे होडीतून जाताना अविस्मरणीय दर्शन मिळते. किल्ल्यात दाखल झाल्यावर तटबंदीचे अनोखे बांधकाम आपल्याला पाहता येते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर नारळाचा झाडांची एकप्रकारे रास मांडल्या सारखी वाटते. किल्ल्यात जुळ्या नारळाचे झाड पर्यटकांचे खास आकर्षण होते. मात्र काही वर्षापूर्वी हे झाड वीज पडल्याने नष्ट झाले.

Web Title: sindhudurg news sidhudurg fort story