सिंधुदुर्गात वाघाचे अस्तित्व ठळक 

प्रभाकर धुरी 
सोमवार, 5 मार्च 2018

राज्यात वाघांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने वाघाचे अस्तित्वच धोक्‍यात आल्याची भिती आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी ठळकपणे वाघाचे दर्शन घडत आहे. जिल्ह्यातील आंबोली पासून मांगेली आणि विर्डी पर्यंतचा पश्‍चिम घाटाचा पट्टा वाघांचा कॉरिडॉर मानला जात आहे. त्या पट्टयात वाघाचे अस्तित्त्व आढळले आहे. त्यांची संख्या दोनपेक्षा अधिक आहे. शिवाय त्यात नर, मादी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सगळीकडे वाघांची संख्या घटत असताना सिंधुदुर्गमध्ये वाघांची वाढती संख्या नक्‍कीच दिलासादायक म्हणावी लागेल. 

पश्‍चिम घाट आणि बुडित क्षेत्र नैसर्गिक अधिवास 
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झालीत. त्यामुळे धरणापलिकडची गावे उठली. तो भाग बुडित क्षेत्रात गेला. तेथील जंगलमय परिसर आणि त्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वाघाच्या निवासासाठी नैसर्गिक ठिकाण बनते आहे. अनेक वन्यप्राण्यांचा तेथे मुक्‍तपणे अधिवास आढळतो. 

दोन वाघ कॅमेऱ्यात "ट्रॅप'! 
तालुक्‍यातील जंगल परिसरात वनविभागाने खासगी कंपनीच्या माध्यमातून लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये दोन वाघ ट्रॅप झाले होते. त्यातील एक मादी होती. त्यामुळे दोडामार्ग तालुक्‍यात वाघांचे अस्तित्व अनेक वर्षापासून आहे यावर शिक्‍कामोर्तब झाले. 

विर्डीतही पिल्लांसह मादी ट्रॅप 
महाराष्ट्र-गोवा सीमेवर विर्डी गाव आहे. अर्धा विर्डी गाव गोव्यात तर अर्धा महाराष्ट्रात येतो. विर्डी परिसरात निबीड अरण्य आहे. तेथे वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात पिल्लासह वाघिणीचे दर्शन घडले होते. गोवा शासनाने त्याबाबत समाधान व्यक्‍त केले होते. 

डेस्टिनेशन अनिश्‍चित 
वाघ फार काळ एका ठिकाणी राहत नाही. भक्ष्याच्या शोधात तो फिरत राहतो. आता आंबोलीत दिसलेला वाघ चार दिवसांनी मांगेलीतही दिसू शकतो. त्याचा प्रवासाचा वेगही अधिक असतो. त्यामुळे त्याचा मुक्‍काम कायम एका ठिकाणी असत नाही. 

व्याघ्रगणनेचा काळ 
वाघाचे अस्तित्व शोधण्यासाठी व्याघ्रगणना उन्हाळ्यात केली जाते. बहुतेक ठिकाणचे पाणी आटले की उर्वरित पाणवठ्यावर वाघ हटकून पाणी पिण्यासाठी येतो. असे संभाव्य पाणवठे शोधून, त्याच्या पाऊलखुणांचा माग घेऊन कॅमेरे लावले जातात किंवा मोठ्या वृक्षावर मचाण बांधून त्याच्या हालचाली टिपल्या जातात. याच काळात वाघांची नेमकी संख्या कळण्यास मदत होते. येत्या उन्हाळ्यातही व्याघ्रगणना होणार आहे. त्यावेळी नेमकी संख्या कळू शकेल. 

नर-मादीच्या पाऊलखुणा 
काही दिवसांपूर्वी तालुक्‍यातील एका भागात वनकर्मचाऱ्यांना वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यांनी त्याची योग्यप्रकारे पाहणी केली असता त्या नर आणि मादी अशा दोघींच्या पाऊलखुणा असल्याचे दिसले. वाघाच्या पंजाचा आकार गोल तर वाघिणीच्या पंजाचा आकार लांब दिसतो. शिवाय पंजाचे उंचवट्यावरून नर-मादी ओळखता येतात असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. 

वाघाचे अनेकदा दर्शन 
चौकुळमधील शाम गवंडे आणि दत्ता गावडे यांना आंबोली येथे 27 फेब्रुवारीला वाघ दिसला. तालुक्‍यातल्या अनेकांनाही मांगेली, गिरोडे, खोक्रल परिसरातही अनेकदा वाघाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे वाघाचा वावर आंबोली पासून मांगेली पर्यंतच्या भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संख्या वाढल्याची शक्यता
काही महिन्यांपूर्वी तिलारी परिसरात वाघाच्या पाऊलखुणा मिळाल्या. त्यानुसार तेथे दोन वाघ असल्याचे स्पष्ट झाले. त्यात नर-मादी असल्याने त्यांची संख्या वाढली असण्याची शक्‍यता आहे. शिवाय अन्यत्रही आणखी वाघ असू शकतात. उन्हाळ्यात व्याघ्रगणनेवेळी ती संख्या नेमकी कळेल. असे एका वनाधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले. 

हत्त्येची भिती 
वाघाच्या वावराचे नेमके ठिकाण कळले तर परप्रांतातील शिकाऱ्यांकडून वाघाची शिकार होण्याची भिती असते. वाघाची शिकार आणि तस्करी करणारी टोळी नेहमीच त्यादृष्टीने कार्यरत असते. त्यामुळे वनविभागाकडून वाघाच्या वावराचे नेमके ठिकाण सांगण्याबाबत असमर्थता दर्शवली जाते. 

महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू
देशात वाघाच्या जतन अणि संवर्धनावर भर दिला असताना मागील वर्षात महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 13 वाघांचा मृत्यू नैसर्गिक, आठ वाघांचा शिकारीमुळे, तीन वाघांचा मृत्यू विषप्रयोगामुळे, एका वाघाचा मृत्यू हद्दीच्या वादात तर एकाचा मृत्यू अपघातात झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक, प्रत्येकी सहा वाघ, नागपूर चार आणि ताडोबा अंधारी प्रकल्पात तीन वाघ, तर गडचिरोली, मेळघाटमध्येही प्रत्येकी एक वाघ मरण पावले आहेत. 

मृत्यूची आकडेवारी 
वर्ष ः 2017-2016-2015-2014-2013 
वाघांची संख्या ः 22-14-13-06-15 

असे झाले मृत्यू (2017) 
मध्यप्रदेश-24 
महाराष्ट्र-22 
उत्तराखंड-15 
कर्नाटक-14 

वाघांचा कॉरिडॉर धोक्‍यात 
आंबोली ते मांगेली या वाघाच्या कॉरिडॉरसह त्याच्या पट्ट्यातील दहा किलोमीटर क्षेत्रातील गावे पर्यावर संवेदनशील क्षेत्रात घेणे आवश्‍यक होते. वनशकी संस्थेतर्फे स्टॅलीन दयानंद यांनी उच्च न्यायालयात त्यासाठी 2011 मध्ये याचिका दाखल केली आहे. संबंधित क्षेत्र संरक्षित करण्याच्या दृष्टिने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यातील वृक्षतोडीवर बंदी घातली होती; मात्र 2013 पासून या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे वाघाचा कॉरिडॉर धोक्‍यात आला आहे. 

वन्यप्राणी मानव संघर्ष वाढला 
सह्याद्री पट्ट्यातील डोंगर वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याचे बोडके झाले आहे. केरळीयनांनी लाखो झाडांची कत्तल रबर लागवडीसाठी म्हणून केली. शिवाय स्थानिकांनीही तिलारी बुडित क्षेत्रातील जंगले नष्ट करण्याचा सपाटा सुरू ठेवल्याने मानव आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष सुरू आहे. वाघांचा नैसर्गिक अधिवास धोक्‍यात आला आहे. 

दोडामार्गमध्ये एकाची हत्या, एकाचा मृत्यू 
दोडामार्गमध्ये काही वर्षापूर्वी एका वाघाची हत्या करण्यात आली होती. शिरंगे-खानयाळे परिसरातील एका व्यक्‍तीला वाघाच्या हत्येप्रकरणी अटकही झाली होती. पण नंतर त्याची निर्दोष मुक्‍तता झाली. दुसऱ्या प्रकरणात जंगलात सापडलेल्या वाघाच्या बछड्याला वनविभागाने कात्रज (पुणे) येथील प्राणीसंग्रहालयात धाडले होते. दोडा नावाच्या त्या वाघाचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाल्याचे तेथे भेट दिल्यावर कळले. त्यामुळे येथेही एका वाघाची हत्या व एकाचा मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. 

शिकाऱ्यांना कळसुलीत अटक 
काही वर्षांपूर्वी उपवनसंरक्षक नरेश झिरमुरे यांनी कळसुली परिसरातून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळक्‍याला अटक केली होती. त्यांच्याकडे वाघाला पंजाच्या मार्गे ट्रॅप करून शिकार करण्याचे साहित्य आढळले होते. तोच ट्रॅप वाघाच्या शिकारीसाठी वापरला जात असल्याने वन्यप्राणी त्यातून सुटण्याची सुतराम शक्‍यता नसते. 

कसा असतो ट्रॅप? 
वाघाची टस्करी करणारी टोळी वाघाचा वापर कळला की वाघाचा माग काढून त्याच्या येण्या जाण्याच्या वाटेवर पाणवठ्याजवळ तो ट्रॅप लावतात. ट्रॅप लोखंडी आणि पंजासारखा पसरट असतो. त्यावर पाय पडला की आपण मूठ आवळतो तसा तो आवळला जातो. त्यात वाघ किंवा अन्य जनावराचा पाय मिळाला तर त्याने कितीही प्रयत्न केला तरी जमिनीत घट्ट पुरून ठेवलेल्या त्या ट्रॅप मधून पाय बाहेर निघणे अशक्‍यच असते. एकदा का वाघ त्यात अडकला की त्याची शिकार केली जाते. 

राज्यात दोनशेपेक्षा अधिक वाघ 
अलिकडे केलेल्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात दोनशेपेक्षा अधिक वाघ असल्याचे निष्पन्न झाले आहे. बिबट्यांची संख्या वाघापेक्षा खूप अधिक आहे. गणनेदरम्यान ती साडेतीनशेहून अधिक असल्याचे उघड झाले. अस्वलांची संख्या मात्र राज्यात सर्वाधिक म्हणजे साडेपाचशेहून अधिक आहे. 

वाघ वाचविण्याची गरज 
महाराष्ट्रात वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. पर्यावरणप्रेमींसाठी ती समाधानाची बाब असली तरी वाघांची वाढते मृत्यू ही चिंतेची बाब आहे. 2017 मध्ये वाघांच्या मृत्यूमध्ये मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे वाघांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होण्याची गरज आहे. वाढती वृक्षतोड, शिकारी आणि तस्करांचा जंगलभागातील वाढता वावर, तस्करीसाठी उपलब्ध बाजारपेठा आणि वाढती अवयव तस्करी यावर प्रयत्नपूर्वक आळा घालण्याची गरज आहे. वाघाचे शवविच्छेदन करणाऱ्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्यानेच अवयवाची तस्करी केल्याचा आरोप ताजा असल्याने वाघाच्या अस्तित्वाला धोका पोचवू शकणाऱ्या सगळ्यांकडे वनविभाग आणि शासनाने करडी नजर ठेवण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Tiger Domicile in district