esakal | समुद्राला उधाण; शिरोडा बिचवरील झाडे, विद्युत खांब कोसळले
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्राला उधाण; शिरोडा बिचवरील  झाडे, विद्युत खांब कोसळले

समुद्राला उधाण; शिरोडा बिचवरील झाडे, विद्युत खांब कोसळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग): तालुक्यात दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. समुद्रालाही उधाण आले असून शिरोडा (shiroda beach) येथे किनाऱ्यावरील विद्युत खांब व सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत.

हवामान खात्याने अति मुसळधार पावसाच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन ते तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने आज चांगलाच जोर धरला. यामुळे नदी, ओहोळ तुडुंब भरून वाहत असून पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे समुद्रही खवळला असून मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. शिरोडा येथे समुद्राला उधाण आले असून किनाऱ्यालगत असलेली सुरूची झाडे उन्मळून पडत आहेत. अनेक ठिकाणी कोसळणारी झाडे विद्युत तारांवर पडून विजेचे खांबही जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरातील विद्युतपुरवठाही खंडित झाला आहे.

काही ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात आल्यामुळे त्याचा फटका किनारा परिसराला बसत नाही. अन्य बंधारे नसलेल्या ठिकाणी समुद्राच्या लाटांमुळे झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, आज तालुक्यात दुपारपर्यंत कोणत्याही पुलावर पाणी न आल्याने सर्व मुख्य मार्गांवरील वाहतूक सुरू होती. पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाल्याने भात शेती लावणीलाही वेग आला आहे. गेल्या २४ तासांत तालुक्यात १३३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १२७४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

loading image