
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एका दिवसातील झालेल्या मृत्यूमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे.
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनामुळे आणखी सात जणांचे मृत्यू झाले. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या 111 झाली. आणखी 46 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 37 व्यक्तींनी कोरोनावर मात केली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी (ता. 7) दुपारी 58 कोरोनाबाधित आढळले होते. आज दुपारपर्यंत आणखी 46 व्यक्तींचे अहवाल बाधित आले. एकूण बाधित संख्या चार हजार 268 झाली आहे. यातील तीन हजार 374 कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आता 883 रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी सात रुग्णांची तब्येत चिंताजनक आहे. त्यातील दोघे ऑक्सिजनवर, तर पाच जण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार 27 नमुने घेण्यात आले आहेत. यातील आरटीपीसीआर 17 हजार 727 नमुने असून, त्यातील तीन हजार 171 नमुने बाधित आहेत. अँटिजेन चाचण्या 11 हजार 300 झाल्या. त्यात एक हजार 197 अहवाल बाधित आले.
सर्वाधिक मृत्यू सावंतवाडीत
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक बाधित कणकवली तालुक्यात एक हजार 453 आहेत. पाठोपाठ कुडाळ तालुक्यात 969, सावंतवाडी 535, वेंगुर्ले 381, मालवण 316, देवगड 281, दोडामार्ग 185, वैभववाडी 137 रुग्णसंख्या आहे. जिल्ह्याबाहेरील 13 रुग्ण आहेत. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 29 मृत्यू आहेत. कणकवली तालुक्यात 25, कुडाळ 19, मालवण 11, वैभववाडी 8, वेंगुर्ले 9, देवगड 7 आणि दोडामार्ग तालुक्यात दोन मृत्यू आहेत. गोव्यातील एका व्यक्तीचा येथे मृत्यू झाला होता.
पाच तालुक्यांतील सात जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सात व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यातील कणकवली तालुक्यातील तीन, तर देवगड, कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये कणकवली सांगवे येथील 75 वर्षीय महिलेचे वार्धक्याने निधन झाले. कणकवली शहरातील 61 वर्षीय महिलेस उच्च रक्तदाब व मधुमेह; तर 82 वर्षीय पुरुषास उच्च रक्तदाब होता. वेंगुर्ले शहरातील 82 वर्षीय व्यक्तीस दीर्घकालीन श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब व कंपघात होता. कुडाळ पिंगुळी येथील 67 वर्षीय महिलेस उच्च रक्तदाब व हृदयरोगाचा त्रास होता. सावंतवाडी मळगाव येथील 52 वर्षीय व्यक्तीस मधुमेह होता.
कणकवलीतील सर्वाधिक 269 सक्रिय रुग्ण
सक्रिय 883 रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील सर्वाधिक 269 रुग्ण आहेत. कुडाळ 248, वेंगुर्ले 98, सावंतवाडी 94, मालवण 60, दोडामार्ग 52, देवगड 43, तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्ण सक्रिय आहेत.
संपादन : विजय वेदपाठक