टंचाई आराखडा वाढला पण... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 11 गावे 641 वाड्यांचा 7 कोटी 36 लाख 45 हजार रूपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी देत 144 कामांनाही मंजूरी दिली आहे.

सिंधुदुर्गनगरी - उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. जिल्ह्यात पाणी टंचाईने डोकं वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 11 गावे 641 वाड्यांचा 7 कोटी 36 लाख 45 हजार रूपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी देत 144 कामांनाही मंजूरी दिली आहे.

गतवर्षी हा आराखडा सहा कोटी 13 लाख रुपये एवढा होता. तर या आराखड्यात चार गावे आणि 513 वाड्यांचा समावेश होता; मात्र जून अखेर 40 टक्केच कामे पूर्ण होऊ शकली. त्यामुळे पाणी टंचाई प्रश्‍न कायम आहे. 

राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होतो. साधारणपणे दरवर्षी साडेतीन हजार पेक्षा जास्त मिलीमीटर मीटर इतका पाऊस पडतो; मात्र या तुलनेत पाणी साठा होत नाही. जिल्ह्यातील ठराविक पाणीसाठे वगळता उर्वरित पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. परिणामी पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. काही जण पाणी टॅंकरने तर काही जणांना पाणी विकत घ्यावे लागते. 

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई निवारण आराखडा एकूण 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यात 11 गावे व 641 वाड्यांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. नळपाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीच्या कामासाठी 3 कोटी 58 लाख 45 हजार तरतूद आहे.

विंधन विहिरी दुरूस्तीची कामांना 7 लाख 30 हजार, नवीन विंधन विहिरी घेणे 1 कोटी 88 लाख 30 हजार, तात्पुरत्या पुरक नळयोजना घेणे 1 कोटी 25 लाख 50 हजार, विहिर खोल करणे, गाळ काढणे, सार्वजनिक विहिर दुरुस्त करणे 56 लाख 90 हजार रुपये आहेत. असा एकूण 11 गावे 641 वाड्यांना 7 कोटी 36 लाख 45 हजार निधी आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. तर कामाच्या 144 प्रस्तावना मंजूरी दिली आहे. पण ही कामे कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आराखड्यात समाविष्ट वाड्या व गावामध्ये दोडामार्ग 20 वाड्या, सावंतवाडी तालुक्‍यात 45 वाड्या, वेंगुर्ले तालुक्‍यात 75 वाड्या, कुडाळ तालुक्‍यात 1 गाव 122 वाड्या, कणकवली तालुक्‍यात 2 गाव 112 वाड्या, वैभववाडी तालुक्‍यात 1 गाव 68 वाड्या, देवगड तालुक्‍यात 4 गाव 101 वाड्या आणि मालवण तालुक्‍यात 3 गावे व 98 वाड्यांचा समावेश केला आहे. 

पाणी समस्या मिटणार कधी ? 

जिल्ह्यात मुबलक पाऊस पडतो; मात्र योग्य नियोजन नसल्याने पाण्याचा सदुपयोग होत नाही. प्रशासनाची गाव तेथे तलाव ही योजना सुरू व्हायच्या पूर्वीच बंद झाली. त्यातही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत; मात्र अद्यापही पाणी टंचाई समस्या संपलेली नाही. पाणी टंचाई केव्हा संपुष्टात येणार असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Water Scarcity Plan By Collector