रिक्त पदांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार होणार ठप्प

विनोद दळवी
Tuesday, 22 September 2020

सहा प्रमुख पदे रिक्त असताना शासनाने अजून चार प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

ओरोस : रिक्त पदांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभारच ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनीच आज याची कबुली दिली. आपण पदभार स्वीकारल्यावर जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या अधिकारीपदांची माहिती त्या-त्या विभागाच्या सचिवांना लेखी कळविली आहे. तरीही शासनाने नव्याने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शासन आदेश असल्याने आम्हाला ते डावलता येत नाहीत; परंतु सध्याच्या परिस्थितीत रिक्त पदे पाहता कामच थांबणार आहे. रिक्त पदांसाठी आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी दिली. 

डॉ. वसेकर यांनी अध्यक्ष दालनात पत्रकारांशी संवाद साधला. सहा प्रमुख पदे रिक्त असताना शासनाने अजून चार प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या जागेवर बदली अधिकारी दिलेले नाहीत. एवढी रिक्त पदे असताना कारभार कसा हाकणार, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी ही कबुली दिली. ते म्हणाले, ""याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे.'' 

अंगणवाडी सेविकांच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेत अंगणवाडी सेविका काम करणार नाहीत, असा इशारा दिला आहे. याबाबत डॉ. वसेकर म्हणाले, ""शासनाचा अंगणवाडी सेविकांना कोविडचे काम देऊ नये, असा एक पूर्वी आदेश होता. त्यामुळे आम्ही पहिल्या आदेशात त्यांचा समावेश केला नव्हता. त्यानंतर शासनाने नवीन आदेश काढत समावेश करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही नवीन आदेश काढून अंगणवाडी सेविकेचा समावेश केला. हा शासन आदेश आहे. तो सर्वांना पाळावाच लागणार आहे. ही जागतिक महामारी आहे. त्यात सरकारी कर्मचारी असणाऱ्या सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा आहे. अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला नाही तर अहवाल मागवून घेऊ. त्यानंतर काय करायचे ते ठरविता येईल.'' 

कोविडमुळे डॉक्‍टरच हजर होत नाहीत 
डॉ. वसेकर म्हणाले, ""जिल्ह्यात डॉक्‍टर कमी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी आम्ही भरती प्रक्रिया राबवित आहोत. आतापर्यंत अनेक वेळा ही प्रक्रिया झाली. पात्र डॉक्‍टरांना कोविड सेवा द्यायची आहे, असे समजले की ते हजरच होत नाहीत. परजिल्ह्यातील डॉक्‍टर हजर झाले नाहीतच. यातील दोन डॉक्‍टर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. तेही हजर झालेले नाहीत.'' 

प्रमुख दहा पदे रिक्त 
जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा हिवताप अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अतिरिक्त लेखा व वित्त अधिकारी अशी एकूण दहा पदे रिक्त आहेत. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Zilla Parishad will come to a standstill due to vacancies