पोस्टात पैसे जलद भरायचे आहेत मग हे ॲप डाऊनलोड करा....

sindudurg Response to online transactions kokan marathi news
sindudurg Response to online transactions kokan marathi news

कणकवली (सिंधुदुर्ग) : भारतीय पोस्ट खात्याच्या इंडियन पोस्ट बॅंकेसाठी मोबाईल ॲपद्वारे बॅंकिंग व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. वर्षभरामध्ये जिल्ह्यात तब्बल ७२ हजार खाती सुरू करण्यात आली आहेत. गेले तीन दिवस जनजागृती शिबिरातून गावागावात पोस्टमन हे ॲप डाउनलोड करून देत आहेत. त्यामुळे तीन दिवसांत सरासरी ३ हजार खाती दिवसाला सुरू केली जात आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे.

बॅंकिंग क्षेत्रातील पोस्ट खात्याचा प्रवेश सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विश्‍वासार्हता मानली जात आहे. केंद्र शासनाने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत पोस्ट खात्याला बॅंकिंग व्यवहाराचे अधिकार दिले. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक (IPPB) स्थापना झाली. २१ जानेवारी २०१९ पासून मोबाईल अॅपद्वारे बॅंकिंग व्यवहार सुरू झाले. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. याचे कारण इंटरनेट नेटवर्किंगमुळे अनेक अडचणी येत होत्या; मात्र पोस्ट खात्याने जनजागृतीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत पोस्ट बॅंकिंग ॲप डाउनलोड करून दिले आहे.

गुगल प्ले स्टोअरमधून ॲप डाऊनलोड

जिल्ह्यात जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. यातील १० टक्के म्हणजे जवळपास ७२ हजार पोस्ट खात्याचे ऑनलाईन मोबाईल बॅंकिंगचे ग्राहक बनले आहेत. जनजागृतीसाठी पोस्ट खात्याने २७ ते २९ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत विशेष शिबीर राबवले आहे. गावागावांमध्ये पोस्टमनच्या माध्यमातून ऑनलाईन खाते सुरू केले जात आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरी ३ हजार खाती जिल्ह्यात सुरू झालेली आहेत. ग्राहकांना आधार कार्ड नंबर नोंदवून थम्ब केल्यानंतर ऑनलाइन आयपीपीबी खाते क्रमांक दिला जातो.

त्यानंतर गुगल प्ले स्टोअरमधून ॲप डाऊनलोड करून आपल्याला सगळे ऑनलाईन व्यवहार करता येतात. मनी ट्रान्सफरसाठीही या ॲपचा चांगला उपयोग होतो. विशेष म्हणजे पोस्टाचे हे खाते शून्य रकमेवर सुरू केले जाते. या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने ॲपच्या माध्यमातून वीज बिल, मोबाईल रिचार्ज, विमा भरणे, खात्यामध्ये पैसे जमा करणे असे सगळे व्यवहार घरबसल्या करता येत आहेत. 

पोस्टमन देणार गावात सेवा 

जिल्ह्यातील ३७१ पोस्ट खात्यात कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये पोस्टमन घरोघरी जाऊन ही सेवा देणार आहे. देशातील कोणत्याही बॅंकेचा व्यवहार या ॲपद्वारे करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा वेळ वाचणार आहे. व्यवहार योग्य पद्धतीने तसेच सुरक्षित राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक किंवा सेवानिवृत्ती धारकांचे निवृत्तीवेतनही या पोस्ट बॅंकिंगद्वारे होणार आहे.

सुरक्षित बॅंकिंग व्यवहारासाठी 

जिल्ह्यामध्ये ३७१ पोस्ट कार्यालये आहेत. त्या अंतर्गत प्रत्येक दहा वर्षावरील व्यक्ती खातेदार बनवण्याचा प्रयत्न आहे. वर्षभरात ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय आणि नाबार्डच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. प्रत्येक व्यक्तीने हे ऑनलाईन बॅंकिंग ॲप डाउनलोड करावे. सुरक्षित असे बॅंकिंग व्यवहार याद्वारे होतील.
- आर. रणजित, मॅनेजर, इंडियन पोस्ट बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com