पंधरा दिवसात केल्या कोरोना पाॅझिटिव्हबाबत सहा हजारांवर टेस्ट... कुठल्या जिल्ह्यात वाचा

विनोद दळवी
Friday, 31 July 2020

कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 191 नमुने मिळाले. त्यामुळे नमुन्यांची संख्या सहा हजार 51 झाली आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात आणखी आठ कोरोना रुग्ण वाढले. जिल्ह्याची रुग्णसंख्या 364 झाली. एकाला डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्तांची संख्या 271 झाली. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत तपासणी नमुने संख्या झपाट्याने वाढत आहे. आज या संख्यने सहा हजारांचा आकडा पार केला आहे. अहवालांची संख्याही सहा हजाराच्या उंबरठ्यावर आहे. 

जिल्ह्यात बुधवारी (ता. 29) सायंकाळी दहा रुग्ण वाढले होते. त्यामुळे 346 वर असलेली बाधित संख्या साडेतीनशेचा आकडा पार करीत 356 वर पोहोचली होती. काल (ता.29) सायंकाळी वाढलेल्या दहा रुग्णामध्ये सावंतवाडी तालुक्‍यातील कारिवडे येथील तीन, कुडाळ तालुक्‍यातील झाराप येथील एक व सोनवडे-सरंबळ येथील एक आणि कुंभवडे येथील एकाचा समावेश आहे. 

कणकवली तालुक्‍यातील नांदगाव येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणा हादरली. आज सकाळी बाधित आलेले दोन रुग्ण काल (ता. 29) मालवणात रॅपीड टेस्टमध्ये बाधित आलेले आहेत. संध्याकाळी तीन रुग्णांचे अहवाल बाधित आले. त्यात सावंतवाडी तालुक्‍यातील इन्सुली येथील एक, कणकवली तालुक्‍यातील नांदगाव येथील एक व कणकवली शहरातील एक अशाप्रकारे रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 191 नमुने मिळाले. त्यामुळे नमुन्यांची संख्या सहा हजार 51 झाली आहे. यातील 5 हजार 917 नमूने प्राप्त झाले आहेत. अजुन 134 अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील 5 हजार 559 अहवाल निगेटिव्ह आहेत. बाधितांपैकी 271 रुग्ण बरे होवून घरी परतले. जिल्ह्यात 84 रुग्ण सक्रिय आहेत. 

आयसोलेशन कक्षात सध्या 127 रुग्ण आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयात 40 बाधित आणि 42 संशयित आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 23 बाधित आणि 1 संशयित आहे. कोविड केअर सेंटरमध्ये 14 बाधित आहेत. चौघे बाधित होम क्‍वारंटाईन आहेत. तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान, काल (ता.29) जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील चार हजार 424 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. 

संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये एक हजार 564 व्यक्ती वाढल्याने येथे 18 हजार 197 जण आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील एक व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या 52 झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील एक हजार 506 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 14 हजार 710 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 59 व्यक्ती वाढल्या असून येथील संख्या तीन हजार 435 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने एक हजार 602 व्यक्ती दाखल झाल्याने दोन मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या एक लाख 58 हजार 227 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 37 कंन्टेंटमेंन झोन सक्रिय आहेत. 

स्टाफ नर्स बाधितमुळे जिल्हा रुग्णालय हादरले 
बुधवारी (ता. 29) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या सहा कोरोना बाधितमध्ये दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत. दोन्ही रुग्ण स्टाफ नर्स आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालय हादरले आहे. यापूर्वी एक नर्स बाधित झाली होती. त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. दोन स्टाफ नर्स बाधित आढळल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासन अलर्ट झाले आहे.

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six thousand tests on corona positivity done in fifteen days