‘विकास हवा तर चेहरा नवा’ ; प्रस्थापितांनाच बसला घोषणेचा धक्का

slogan of election panel established shock one reason of candidates in ratnagiri guhagar
slogan of election panel established shock one reason of candidates in ratnagiri guhagar
Updated on

गुहागर (रत्नागिरी) : ‘विकास हवा तर चेहरा नवा’ ही गावपॅनेलची घोषणा इतकी लोकप्रिय झाली की, तळवलीत प्रस्थापितांच्या पॅनेलला तीन उमेदवारच मिळालेले नाहीत. गावपॅनेलचे प्रभाग २ मध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. प्रस्थापित म्हणजेच विनायक मुळे समर्थक गटाला हा धक्का आहे. आता गाव पॅनेलने कंबर कसली आहे.

गुहागर तालुक्‍यातील तळवली ग्रामपंचायतमध्ये १५ वर्षे विनायक मुळे समर्थक गटाची सत्ता होती. तालुक्‍याच्या राजकारणात मुळे पडद्याआड मोठी भूमिका निभावत असतात. तळवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये २ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी व १ जागा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रभागातून विनायक मुळे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत; मात्र त्यांना आणखी एक सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार मिळालेला नाही. या ठिकाणी आता सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी तिरंगी लढत होणार आहे. हे दोन्ही उमेदवार गावपॅनेलचे निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

प्रभाग २ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गाचा १ आणि सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाचे २ उमेदवार निवडून आणायचे आहेत. येथे मुळे समर्थक गटाला स्त्री उमेदवारच न मिळाल्याने गाव पॅनेलच्या दोन्ही स्त्री उमेदवार निवडून आल्या. प्रभाग ३ मध्ये गाव पॅनेल विरुद्ध मुळे समर्थक गट अशी थेट लढत होणार आहे. गावातील एकूण वातावरण गाव पॅनेलच्या बाजूने आहे. येथे शिवसेना विरुद्ध गाव पॅनेल अशी निवडणूक भासविण्याचा प्रयत्न झाला.

माणसांची खडान्‌खडा माहिती

मुळेंना गावातील प्रत्येक वाडीची, माणसांची खडान्‌खडा माहिती आहे. गेली १५ वर्षे आमदार भास्कर जाधव यांचे जवळचे, विश्वासू सहकारी म्हणून काम केलेले असल्याने डावपेच उलटवण्याची कलाही त्यांच्याकडे आहे. सर्वस्व पणाला लावून निवडणुकीनंतरही ते ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवू शकतात. हे गाव पॅनेलच्या मंडळींना माहिती आहे. त्यामुळेच संपूर्ण बहुमताची रणनीती आखली जात आहे.

एकाच गटाकडे १५ वर्षे सत्ता; विरोधात लाट 

५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या विभावरी मुळे सध्या पंचायत समिती सभापती आहेत. त्यापूर्वी त्याच तळवली ग्रामपंचायतीच्या सरपंचही होत्या. एकाच गटाकडे १५ वर्षे सत्ता राहिल्याने या गटाविरोधात लाट तयार झाली आहे. मुळे समर्थक गटाला प्रस्थापित ठरवून निवडणूक लढवली जात आहे. गावातील सर्व समाज आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन गाव पॅनेल तयार केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com