Gram Panchayat Election : हायटेक प्रचारासाठी समाजमाध्यमांचा आधार

व्हॉट्सॲप स्टेट्स, फेसबुक पेजवरून विकास कामांची माहिती प्रसिद्ध केली असून मतदान करण्याचे आवाहन केले
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSakal

पाली : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवार, कार्यकर्ते घरोघरी गाठीभेटीबरोबरच हायटेक प्रचाराला पसंती देत आहेत. यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग केला जात आहे. अनेकांनी आपल्‍या व्हॉट्सॲप स्टेट्स, फेसबुक पेजवरून विकास कामांची माहिती प्रसिद्ध केली असून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर काही उमेदवार आपल्‍या प्रतिस्‍पर्धावर समाज माध्यमांतून टीकास्त्र सोडत आहे.

जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि ९९ सदस्यपदाच्या; तर १० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी प्रत्येकाला भेटणे किंवा सतत संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. पण वेळेच्या मर्यादेमुळे ते शक्य नसल्‍याने समाज माध्यमांचा आधार घेतला जात आहे.

जवळपास सर्वच पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या पॅनलचे डिजिटल बॅनर व व्हिडिओ तयार केले आहेत. शिवाय पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखाही समाज माध्यमावर मांडला जात आहे. सत्तेत असताना केलेली कामे, राबविलेल्या योजना व उपक्रम यांचे फोटो, व्हिडिओ व माहिती प्रसारित केली जात आहे.

याशिवाय अनेकजणांनी आपला अजेंडाही समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत.काही उमेदवार व कार्यकर्ते समाज माध्यमांद्वारे तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार समोर आणत आहेत.

या सगळ्यात मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. आपला उमेदवार कसा चांगला आहे, हे दाखवण्याची खटाटोप सुरू असून काही वेळेला समाज माध्यमांवरील वाद शिगेलाही जात आहे. निवडणुका गाव-खेड्‌यातील असल्‍या तरी प्रचारासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सर्वांकडूनच होताना दिसतो.

राजकीय विश्‍लेषण

फेसबुक, व्हॉट्सअपवर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. यावर निवडणुकांची चर्चा रंगत आहेत. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी, कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली, याचे विश्लेषण सुरू आहे. याद्वारे उमेदवार व कार्यकर्ते आपल्या निवडून येण्याच्या व न येण्याच्या शक्यतांचा अंदाज बांधत आहेत. शिवाय आपल्यासोबत कोणकोण आहे किंवा नाही हे देखील समजून घेत आहेत.

मोर्चेबांधणी, नियोजनासाठी उपयोग

उमेदवार व विविध पक्षांनी आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे तात्पुरते व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. यावर सभा, भेटीगाठी, प्रचार आदींवर चर्चा, नियोजन केले जाते. शिवाय आढावा घेणे व व्यूहरचना ठरवली जात आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बैठक घेण्यापेक्षा हे अधिक जास्त प्रभावी ठरत आहे. शिवाय वेळ व खर्च देखील वाचतो.

गावखेड्यात इंटरनेट सुविधा पोहोचल्या आहेत. बहुतेकजण स्मार्टफोन व सोशल मीडियाचा वापरतात. या सगळ्याचा उपयोग प्रचारासाठी चांगल्या प्रकारे होत आहे. विशेषतः तरुण मतदारांपर्यंत पोहचणे सहज शक्य झाले असून ध्येयधोरणे व अजेंडा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहचतो.

- उमेश तांबट, उमेदवार, सुधागड

मतदारांशी संपर्क

बहुसंख्य मतदार सहकुटुंब कामानिमित्त मुंबई, ठाणे व पुणे आदी शहरांत स्‍थायिक झाले आहेत. हे मतदार एकगठ्ठा मतदान करतात. त्यामुळे समाज माध्यमांद्वारे मतदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. त्यांना शुभेच्छा संदेश पाठविणे, नियमित विचारपूस करणे, कामाची माहिती देणे अशा गोष्टी सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com