सोशल मिडीयावर ‘कानसेन’ ग्रुपद्वारे संगीताची लयलूट

मकरंद पटवर्धन
Sunday, 4 October 2020

बारा तारखेपर्यंत ते सुरू राहणार असून यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

रत्नागिरी : 'कानसेन' हा संगीतप्रेमींचा ग्रुप तयार झाला आणि याला पाच वर्षे पूर्ण झाली. गेली चार वर्षे यजमान रत्नागिरीकरांच्या पाहुणचारात हे संमेलन लाईव्ह स्वरूपात पार पडले. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे सोशल मीडियाद्वारे सारेजण एकत्र आले आणि संमेलनाला अधिकच व्यापक स्वरूप प्राप्त झाले. फेसबुकच्या माध्यमातून काल (3) संमेलनाला सुरवात झाली. बारा तारखेपर्यंत ते सुरू राहणार असून यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो काळजी करू नका ; परीक्षा पुन्हा होतील 

दरवर्षी राज्यभरातून सुमारे 50-60 जण रत्नागिरीत एकत्र यायचे. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एकत्र येणे शक्य नाही. यावर अ‍ॅडमिन सुनीता गाडगीळ यांनी सोशल मीडियाद्वारे संमेलनाचा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला आणि यामध्ये 480 हून अधिक जण सहभागी झाले आहेत. फेसबुकद्वारे हे सारे एकत्र आले असून यामध्ये लाईव्ह सादरीकरणाबरोबरच काही जुन्या आठवणींनाही उजाळा मिळणार आहे. दिवसभर या ग्रुपवर विविध व्हिडिओ अपलोड होणार असून रात्री 9 वाजता दररोज तासभराचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. काल रांगोळ्या, गणेशवंदना नृत्य, गायन, ईशस्तवन, मंगलाचरण, भक्तिगीते यांचे सादरीकरण झाले. 

हेही वाचा -  श्री शंकरेश्‍वराच्या तटबंदीवरील शिलालेख पेशवे काळातील 

आज शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन, नाट्यगीते, 5 ऑक्टोबरला विविध प्रकारचे गीतगायन, (ता. 6) - सर्व सभासदांची एकमेकांशी ओळख केली जाणार आहे. यामध्ये एकमेकांशी चर्चाही रंगणार आहे. (ता. 7) - संगीताव्यतिरिक्त विविध कलांचे सादरीकरण, चित्रे, रांगोळी, फोटोग्राफी, मूर्तिकला, ओरिगामी, पॉटरी, मेंदी प्रात्यक्षिक, पाककला, विविध हस्तकला यांच्या ध्वनिचित्रफिती सादर होतील. (ता. 8) - लहान मुलांचे कार्यक्रम, यामध्ये कथाकथन, नाट्य, एकांकिका, जादूचे प्रयोग यांचा समावेश असणार आहे. (ता. 9) - विविध गुणदर्शन, यामध्ये काव्यवाचन, कथा, काव्यगायन, अभिवाचन, नाट्यप्रवेश, मिमिक्री, मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असेल. (ता. 10) - एकल वाद्यवादन, वाद्य जुगलबंदी, शब्दाविना तालासुरांची गट्टी, विशिष्ट थीमवरील गीतगायन होईल. (ता. 11) - हिंदी चित्रपट गीते, गझल, देशभक्तिपर गीते, करावके गीतगायन आदी सादर होईल. समारोपाच्या दिवशी (ता. 12) - भरतनाट्यम्, कथ्थक, लोकनृत्य यांसह विविध नृत्यप्रकारांनी संमेलनाची सांगता होईल.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social media through online get together of kansen group in ratnagiri with 480 people participated