समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या बांद्याच्या सुहासिनी

Social work of a woman in Banda
Social work of a woman in Banda

बांदा (सिंधुदुर्ग) - देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षीच जन्म झाला. यामुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता आलं नाही; मात्र त्यानंतर अनेकांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून सतत झटपटाव लागल. विशेषत: अनेक महिलांना ते मिळवूनही दिलं. समाजातील मागास घटकांना सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी मिळविण्याच्या हक्‍कापासून ते स्वच्छता आणि शिक्षणापर्यंत अनेक पातळीवर ते मिळवून दिले. ही लढाई बांद्यातील सुहासिनी रुपाजी तेंडोलकर म्हणजेच सर्वांच्या तेंडोलकर बाई आजही लढत आहेत. त्यांचे आयुष्य म्हणजे अनेक घटनांनी भरलेले आदर्श असं महाकथानकच आहे. दुसऱ्यासाठी जगण्याचं त्यांच ब्रीद आज वयाच्या या टप्प्यातही त्या जपत आहेत. 

बांद्यातील वाफोली रोडवर जर सकाळ- सायंकाळ कचरा कुचरा दिसला तर या रस्ताने नियमित ये-जा करणारे लोक थांबून चौकशी करतात, तेंडोलकरबाई कुठे गेल्या? एवढं हे गणित बनलं आहे. तेंडोलकर यांची ओळख महास्वच्छतादूत अशीच बनलीय जणू. रोज सकाळी उठून आपल्या घराजवळचा एसटीचा रस्ता दुपारपर्यंत साफ करणं हा जणू त्यांचा छंदच! वयाला झेपेल तेवढं दुपारपर्यंत जात त्या साफसफाई करतात. कचऱ्याचे व्यवस्थापन झाले की नंतरच त्या आपल्या दैनंदिन कामाला लागतात. 
मनाची शुद्धता, मनाची स्वच्छता ही सर्वांत मोठी.

तेंडोलकर बाईंचे आयुष्य म्हणजे या मनाच्या शुद्धतेचे एक मोठे उदाहरणच आहे. त्याकाळी युनिसेफतर्फे अंगणवाड्या चालविल्या जायच्या. यात अंगणवाडी सेविका म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळवली या दुर्गम गावातून त्यांनी कामाला सुरुवात केली. कोळवलीतील लोक आजही त्यांची आठवण काढतात ती त्यांच्या मायाळू स्वभावामुळेच. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर दोन लहान मुलांना घेवून दुर्गम भागात त्या राहत होत्या; पण काही वेळातच आजुबाजूची सर्व माणस त्यांच्या कुटूंबाचा हिस्सा बनली. गावात गरीबी होतीच, त्यांना बाईंचा आधार वाटू लागला. 

दुसऱ्याला आधार देणे हा गुण त्यांचा उपजतच असावा. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्‍यातील दुर्गम भागात त्यांनी काम केलं. हे काम करत असताना सामाजिक कामातही त्या नेहमीच पुढे राहिल्या. त्यांनी वेळोवेळी दुसऱ्यांसाठीच लढा दिला. त्यांनीच स्थापन केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून तर त्यांनी अनेक सासरवासीन मुलींचे जीव वाचविले आणि संसारही थाटून दिले. 

बांदा-मुस्लिमवाडी येथील फमिदा शेख यांची साथ त्यांना नेहमीच मिळायची. या दोघींनी मिळून दोन गरिब मुलींची सासरी होणाऱ्या छळापासून मुक्तता करत त्यांचे संसार नव्याने उभे करून दिले होते. त्याचबरोबर अनेक अनाथ, गरजू, अपंग महिला-पुरुषांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठीही तेंडोलकर बाईंनी सतत धडपड केली.

अनेकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला, अनेक वृद्धांना वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवून दिला. घरे मिळवून दिली. कोणतेही सरकारी किंवा सार्वजनिक पद नसताना अनेक आयुष्य त्यांनी घडविली आहेत.  सर्व प्रकारची नाती त्यांनी सांभाळली. माहेर, आजोळ, सासर तसेच दूरवरचे नाते संबंध असो, त्यांनी सर्व नात्यांचे बंध आयुष्यभर जोपासलेत. स्वतःसाठी जगताना त्यांनी इतरांनाही जगण्याचा आनंद दिला. 

मजुरी करणाऱ्या कुटुंबाला दिली दिशा 
वेंगुर्ले तालुक्‍यात काम करत असताना कर्नाटक राज्यातून मोलमजूरीसाठी आलेल्या एका भटक्‍या कुटूंबातील मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणून त्यांनी त्या कुटूंबाला प्रगतीच्या वाटेवर आणल. आज त्या कुटूंबातील प्रत्येक पिढीला शिक्षणाचा महासागर गवसला आहे. ज्या मुलाला त्यांनी शिकविले तो मुलगा सध्या एका कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहे. त्याने नेहमीच आपल्या यशाचे श्रेय तेंडोलकर बाईंना दिले.  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com