सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्यातील पाच गावात होणार माती परिक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

चालू आर्थिक वर्षात प्रत्येक तालुक्‍यातील पाच याप्रमाणे 40 गावांची निवड केली आहे. यातून दहा हजार 715 मातीचे नमुने तपासून त्यांचे आरोग्य कार्ड वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातील 25 हेक्‍टर क्षेत्र याप्रमाणे 200 हेक्‍टर क्षेत्रातील हे नमुने तपासले जाणार आहेत.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जमिनीच्या पोतानुसार शेतकऱ्यांनी पिके घ्यावीत, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात जमीन आरोग्य पत्रिका अभियान सुरू आहे. त्यानुसार 2020-21 या वर्षात जिल्ह्यातील 40 गावांतील 10 हजार 715 मृद नमुने तपासले जाणार आहेत. या माती नमुन्याची तपासणी केल्यानंतर कृषी विभाग योग्य उपाययोजना सुचवणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली. 

पोत सुधारण्यासाठी अभियान 
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, एक पीक पद्धती आणि पाण्याचा बेसुमार वापर जमिनीचा कस कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केंद्राने जमीन आरोग्य पत्रिका अभियान हाती घेतले आहे. गावातील मातीचे नमुने तपासून आरोग्य पत्रिका दिली जाणार आहे. पत्रिकेत जमिनीचा पोत, कमी झालेले घटक, योग्य खतांचा वापर आणि पिकांची माहिती आहे. या पत्रिकेनुसार प्रत्येक शेतकऱ्याने पीक घेणे अपेक्षित आहे. कोरडवाहू क्षेत्रात 10 हेक्‍टरसाठी एक आणि बागायत क्षेत्रात अडीच हेक्‍टरसाठी एक मृद नमुना काढला आहे. त्यानुसार क्षेत्रातील इतर शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप होईल. मृद नमुन्याची मोफत तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदमध्ये ही प्रयोगशाळा उपलब्ध आहे. या कार्यालयात मातीचे नमुने गोळा केले जातात. 

जिल्ह्यात 40 गावांची निवड 
चालू आर्थिक वर्षात प्रत्येक तालुक्‍यातील पाच याप्रमाणे 40 गावांची निवड केली आहे. यातून दहा हजार 715 मातीचे नमुने तपासून त्यांचे आरोग्य कार्ड वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातील 25 हेक्‍टर क्षेत्र याप्रमाणे 200 हेक्‍टर क्षेत्रातील हे नमुने तपासले जाणार आहेत. याचा जिल्ह्यातील 40 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सर्वसाधारण, सूक्ष्म विशेष व पाणी नमुने विश्‍लेषण करून 40 शेतकऱ्यांना मृदाआरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. तपासावयाच्या नमुन्यामध्ये देवगड तालुक्‍यातून 1972 नमुने, वैभववाडीतून 1074, कणकवली मधून 1,393, मालवणमधून 1,121, कुडाळमधून 2,307, वेंगुर्लेतून 654, सावंतवाडीमधून 1,380, दोडामार्गमधून 874 नमुने तपासले जाणार आहेत. 

गतवर्षी 2,216 पत्रिकांचे वाटप 
गतवर्षी आठ तालुक्‍यांमधून 2,216 मातीचे नमुने तपासून ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. तपासलेल्या नमुन्यांमध्ये देवगड तालुक्‍या 324 नमुने तपासले होते. वैभववाडी 147 नमुने, कणकवली 268, मालवण 234, कुडाळ 452, वेंगुर्ले 170, सावंतवाडी 446, व दोडामार्गमध्ये 175 नमुने तपासून ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. 

उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत 
माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच, पण अन्नद्रव्यांवर होणाऱ्या खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठीही मदत होते; म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. 

माती परीक्षण का करावे? 
माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारणपणे जमिनीचा विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्बन, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार या अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण याबाबत माहिती मिळते, त्यानुसार पिकांच्या आवश्‍यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil Testing In Five Villages Of Each Taluka In Sindhudurg