सैनिकाने शेकरूची शिकार करुन लावले स्टेटस अन्...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

कुणकेरी येथील वराडकर हा मार्चमध्ये आपल्या गावी सुट्टीसाठी आला होता. त्याने 2 ते 3 एप्रिलदरम्यान वाघबीळ येथील जंगलात जाऊन दोन शेकरूंची गोळ्या घालून शिकार केली.

सावंतवाडी - तालुक्यातील कुणकेरी येथे जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार 2 ते 3 एप्रिल दरम्यान झाला असून याबाबत लीलाधर वराडकर (वय 25 रा. कुणकेरी वाघबीळ) येथील युवकाला ताब्यात घेतले आहे. शेकरूंची शिकार करून त्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर त्याचा फोटो टाकल्यामुळे हा प्रकार समोर आला. लीलाधर हा सैन्यदलामध्ये कार्यरत आहे.

 

कुणकेरी येथील वराडकर हा मार्चमध्ये आपल्या गावी सुट्टीसाठी आला होता. त्याने 2 ते 3 एप्रिलदरम्यान वाघबीळ येथील जंगलात जाऊन दोन शेकरूंची गोळ्या घालून शिकार केली. यानंतर त्या शेकरूंसोबत त्याची सेल्फी काढून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवली. यामुळे या प्रकाराला वाचा फुटली. हे फोटो वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे सदस्य वन्यजीव संरक्षक रोहन भाटे यांच्या हाती लागल्यावर त्यांनी कॉलद्वारे तसेच लेखीपत्राद्वारे याची माहिती येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण तसेच मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना दिली. या प्रकाराची माहिती तातडीने जिल्ह्याच्या वनविभागाला देण्यात आली. उपवनसंरक्षक चव्हाण यांना  मिळाल्यावर त्यांनी  वराडकर  याला  ताब्यात घेण्याचे  आदेश  दिले. संशयिताला आज सकाळी साडे आठच्या सुमारास त्याच्या कुणकेरी येथील  घरातुन ताब्यात घेतले.

 

याबाबत उपवनसंरक्षक चव्हाण म्हणाले, “कुणकेरी येथील जंगलात झालेल्या या शिकारीची माहिती यापूर्वीच मिळाली होती. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू होती; मात्र वराडकर याला ताब्यात घेतले नव्हते; मात्र आज वराडकर याला ताब्यात घेण्यात आले.” वराडकर याला आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला चार दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, सहाय्यक वनसंरक्षक ई. दा जळगावकर, वनपाल प्रमोद राणे, दिलीप पेडणेकर व इतर वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Hunted and photo take status on whats app

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: