रायगड : हा कसला दगड, ज्यातून वाजतेय घंटा

अजित शेडगे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

अद्भुत आणि चमत्कारिक बाबींनी रायगडचा परिसर भरला आहे. निसर्गसंपन्न असलेल्या रायगडमध्ये अनेक चमत्कारिक बाबी आहेत. अनेक वस्तू विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे या वस्तूतील विज्ञान सर्वसामान्य जनतेला कळेल.

माणगाव (जिल्हा  रायगड) : अद्भुत आणि चमत्कारिक बाबींनी रायगडचा परिसर भरला आहे. निसर्गसंपन्न असलेल्या रायगडमध्ये अनेक चमत्कारिक बाबी आहेत. अनेक वस्तू विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे या वस्तूतील विज्ञान सर्वसामान्य जनतेला कळेल.

माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून कोलाड-इंदापूर रस्त्यावर ३ किलोमीटर निसर्गसंपन्न अशा निळज गावातील डोंगर निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. अनेक तलाव, छोटे ओहोळ व डोंगर दरी असलेला हा परिसर निसर्गरम्य असा आहे. माळरानावर असलेली वनराई व लाल माती कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव देते.

दरम्यान, या जंगलातल्या माळरानावर दगडमाळ आहे. या माळरानात अनेक दगड इतस्ततः विखुरले आहेत. या अनेक दगडात असलेले दोन दगड मात्र, अद्भुत आवाजाचे असून, या दोन दगडांवर दुसऱ्या कोणत्याही दगड अथवा लोखंडी वस्तूने मारल्यास घंटे सारखा आवाज येतो.

परिसरातील दुसऱ्या कोणत्याही दगडावर अशा प्रकारचा नाद होत नाही. दोन दगडांतून मात्र मंदिरातील घंटेसारखा आवाज येतो. निसर्गाचे हे एक अद्भुत आश्चर्य असून, कित्येक शतकापासून हे दगड माळरानावर असेच पडून आहेत. या ठिकाणी अनेक दगड अशा प्रकारे आवाज करणारे होते. काळाच्या ओघात ते या ठिकाणाहून गायब झाले आहेत. उघड्या माळरानावरील हा आश्चर्याचा ठेवा ग्रामस्थांना माहिती असून, या दगडांचे आश्चर्य त्यांना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कारिक या दगडांवर संशोधन होण्याची गरज आहे.

घंटेसारखा आवाज देणाऱ्या या दोन दगडांमुळे हे माळरान घंटेचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांना आकर्षित करेल असे हे ठिकाण असून, यावर संशोधन होणे गरजेचे आहे. या भागात सुविधा निर्माण झाल्यास या ठिकाणचे पर्यटन वाढेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. आमच्या अनेक पिढ्यांना या दगडांविषयी माहिती आहे. पूर्वी या ठिकाणी असे अनेक दगड होते. सध्या दोनच दगड बाकी आहेत. अगदी देवळातील घंटे सारखा या दगडातून आवाज येतो. म्हणून या माळरानाला घंटेचा माळ म्हणतात-जनार्दन वाघमारे, स्थानिक वृद्ध ग्रामस्थ

या दगडांमध्ये घंटेचा आवाज येतो त्यामुळे यांचं संशोधन होणे गरजेचे आहे. या दगडातील धातूचे प्रमाण कळल्यास यातील नेमके सत्य समजेल.
- भरत काळे, शिक्षक

अशा प्रकारचे साधर्म्य असणाऱ्या विविध ठिकाणच्या माहिती व व्हिडीओच्या संदर्भानुसार या ठिकाणचे दगड हे कदाचित उल्कापात, भूगर्भातील खनिजे किंवा लाव्हारसापासून बनलेले असावेत. तसेच हे दगड पोकळ देखील असू शकतील. एखादया धातूच्या भांड्यावर दगड अपटल्यावर जसा आवाज येतो तसा हा आवाज आहे. या दगडांवर त्यांचे मूळ स्वरूप न बदलता योग्य प्रकारे संशोधन होण्याची गरज आहे. तेव्हाच नक्की कळू शकेल की या दगडांमध्ये नक्की काय आहे. - नितीनकुमार राऊत, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sound on stone in