हम भीं किसीसे कम नहीं म्हणत, दिव्यांगांनी बनवल्या पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या

मकरंद पटवर्धन
Friday, 23 October 2020

‘आत्मनिर्भर’ होणाऱ्या दिव्यांगांच्या या सुरेख पणत्या आता रत्नागिरीच्या बाजारपेठेत मिळू लागल्या आहेत.

रत्नागिरी : कोरोनाचा जोर कमी होताना व देश अनलॉक होताना साऱ्यांना दिवाळीची चाहूल लागली आहे. एमआयडीसी येथील आशादीप मतिमंद मुलांच्या पालक संस्थेच्या निवासी स्वयंरोजगार केंद्रात दिव्यांगांनी पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या बनवल्या आहेत. ‘आत्मनिर्भर’ होणाऱ्या दिव्यांगांच्या या सुरेख पणत्या आता रत्नागिरीच्या बाजारपेठेत मिळू लागल्या आहेत.

हेही वाचा - मराठा रस्त्यावर उतरले तर सरकारला पळायला लावेल : नीलेश राणे -

दिवाळीसाठी अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्य चीनमधून येते; परंतु कोरोनाचा प्रसार आणि आत्मनिर्भर भारत योजनेच्या प्रभावामुळे स्थानिक किंवा देशी बनावटीचे साहित्य वापरण्याकडे कल आहे. या दृष्टीने ‘आशादीप’ च्या या पणत्यांना मागणी आहे. मतिमंद मुलांच्या पालकांच्या निधनानंतर काय? या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी आशादीप मतिमंद मुलांची पालक संघटना स्थापन झाली. त्यानंतर स्वयंरोजगार केंद्राची स्थापना केली. येथे मेणबत्ती, ऑफिस फाईल, कागदी पिशव्या, स्क्रीन प्रिंटिंग, रबरी शिक्के तयार केले जातात.

साप्ताहिक, मासिके अंकांपासून कागदी पिशव्या बनवता येत नाहीत. त्यामुळे या अंकांचा काय उपयोग करावा? असा विचार करताना याच्या घड्या घालून, विशिष्ट आकार देऊन पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या होऊ शकतात, हे व्यवस्थापिका स्मिता जडे यांच्या ध्यानात आले. त्यांनी त्यावर प्रयोग करून पणती साकारली. घड्यांचे काम दिव्यांग करतात व आकार देण्याचे काम कर्मचारी करतात. त्यानंतर पुन्हा रंगकाम दिव्यांग करतात. त्यावर कर्मचारी नक्षी रेखाटतात. मग ही पणती पाण्यावर तरंगू लागते. त्यात मेणाची वात घातली जाते. आरोग्य मंदिर येथील रत्नविहार फूड्‌समध्ये या पणत्यांची विक्री सुरू आहे. निवासी केंद्रात २० जण असून ११ कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या येथे पणत्या बनवण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा -  विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आजपासुन कोकण दौऱ्यावर, उद्या रत्नागिरीत दाखल - ​

विविध वस्तू देण्याचे आवाहन

निवासी केंद्रात पिशव्या शिवण्याकरिता वर्तमानपत्रांची रद्दी द्यावी. अनेकांकडे व्हीलचेअर, बेड, वॉटरबेड, टॉयलेट कॉट, युरिन कॉट या विनावापर पडून असतात. त्या संस्थेकडे दिल्यास त्या गरजू रुग्णांना नाममात्र भाड्यात देऊ. त्यामुळे अशा वस्तू, उपकरणे असल्यास संस्थेला द्यावीत, असे आवाहन संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांनी केले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special child creativity for the diwali festival prepare a lamps on water floating in ratnagiri