निसर्गशाळेत ऑनलाईनचे धडे; कोकणातल्या युवतीची शिक्षणासाठी धडपड

राजेश सरकारे
Thursday, 20 August 2020

पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेली युवती 

कणकवली : गावात नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या युवतीला चक्क जंगलात झोपडी बांधून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. बारावी नंतर पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेली ही युवती गेले चार महिने गावीच अडकून पडली. मात्र घरापासून दोन किलोमिटर अंतरावरील जंगलमय भागात झोपडी बांधून तिने आपले पुढील शिक्षण ऑनलाइन माध्यमातून सुरू केले आहे. 

हेही वाचा - अभिनंदनीय बाब! बायोगॅस सयंत्र उभारणीत `या` जिल्ह्याचा डंका ..

तालुक्यातील दारिस्ते गावची स्वप्नाली सुतार ही मुंबईत पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे शिक्षण घेत होती. मार्च नंतर ती आपल्या गावी आली आणि लॉकडाऊन वाढल्याने इथेच अडकून पडली. दरम्यान तिचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.  दारिस्ते गावात मोबाइलचे नेटवर्क नसल्याने इंटरनेटची समस्या निर्माण झाली. मात्र धेय्याने पछाडलेल्या स्वप्नालीने भावाला सोबत घेऊन इंटरनेटची रेंज मिळण्यासाठी लगतचा जंगलमय भाग पिंजून काढला. यात घरापासून दोन किलोमिटर अंतरावर तिला पुरेसे इंटरनेट उपलब्ध झाले. त्यानंतर मे महिन्यात तिने झाडाखाली बसूनच ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतले. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर मात्र ऑनलाइन शिक्षणात अडथळे येऊ लागले. यावेळी तिने छत्रीचा आधार घेत शिक्षण सुरू ठेवले. मात्र मुसळधार पावसात छत्रीचा टिकाव लागत नव्हता. तिची शिक्षणाची धडपड आणि पावसामुळे येणारी अडचण भावांच्या लक्षात आली. तिच्या चारही भावांनी मिळून चांगली इंटरनेट रेंज असलेल्या ठिकाणी तिला झोपडी बांधून दिली. आता या झोपडीतच स्वप्नाली पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून घेत आहे. 

हेही वाचा - कोरोनाचा विसर; डेकोरेशनच्या साहित्यांनी सजली दुकाने...

स्वप्नालीने दहावीमध्ये 98 टक्के गुण मिळविले होते. तर बारावी मध्येही ती कॉलेजमध्ये पहिली आली होती. खरं तर तिला डॉक्टर व्हायचं होतं. पण गरिबी असल्याने तिने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाची निवड केली. पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे आईवडील सतत प्रोत्साहन देत आहेत. तसेच जंगलातील झोपडीत राहून पुढील शिक्षण घेणार्‍या आपल्या कन्येचाही त्यांना सार्थ अभिमान आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story of swapnali sutar a girl online study forest scuttle in sindhudurg