esakal | लयभारी ! अवेळी पावसातही कोकणात सगुणा पद्धत फायदेशीर 
sakal

बोलून बातमी शोधा

SRT Technique Of Paddy Cultivation More Useful In Konkan In Nonseasonal Rains

एसआरटी म्हणजे सगुणा राईस तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यांवर टोकणणी करून भरघोस भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे.

लयभारी ! अवेळी पावसातही कोकणात सगुणा पद्धत फायदेशीर 

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड ( रत्नागिरी ) - कोकणात शेवटच्या टप्प्यात बरसणाऱ्या परतीच्या पावसाचा फटका शेतीचे प्रचंड नुकसान करीत आहे. तयार भात, नाचणी पिकं आडवी झाल्याने पाण्यात भिजून वर्षभर घेतलेली मेहनत वाया जात आहे. उत्पादनात घट होऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे; मात्र या परिस्थितीत सगुणा राईस तंत्रज्ञान पद्धत ही नुकसान न होता फायदेशीर ठरते आहे. मनुष्यबळाची वानवा आणि अवकाळी पाऊस या समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांचे एसआरटी तंत्रज्ञान दिलासा देणारे व उपयुक्त ठरले आहे. 

एसआरटी म्हणजे सगुणा राईस तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यांवर टोकणणी करून भरघोस भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून तसेच उत्पादनात निश्‍चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी करणारी पीक रचना म्हणजेच एसआरटी होय.

याबाबत दापोली मंडणगडच्या एसआरटी सेवक भक्ती केळकर यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 159 शेतकऱ्यांनी यानुसार उत्पादन घेतले आहे. चिपळूण 33, गुहागर 49, खेड 7, लांजा 2, राजापूर 2, रत्नागिरी 18, संगमेश्‍वर 8, दापोली व मंडणगडमधील 40 शेतकऱ्यांनी हा मार्ग अवलंबला आहे. एकूण 19 हेक्‍टर 09 गुंठे क्षेत्रावर जिल्ह्यात लागवड करण्यात आली आहे. या पद्धतीत खिशातून जाणारी मजुरी रक्कम खूपच कमी असते. स्वप्नवत दुप्पट व त्यापेक्षा चांगले पीक मिळते. पाऊस, नांगर आणि माणसं यावर अवलंबून राहावे लागत नाही. नांगरणी, चिखलणी व लावणी करायला न लागल्यामुळे 50 ते 60 % खर्च कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाऱ्या सुपीक मातीची धूप 20 टक्के वाचते. जमीन सुपीक राहते. गवताची एकमेव समस्या भेडसावत असून योग्य पद्धतीने त्याचे नियंत्रण करता येते. 

हे आहे तंत्राचे वेगळेपण 

  • या पद्धतीत वापरलेल्या गादी वाफ्यांमुळे भात रोपांच्या मुळाशी प्राणवायूचे सुयोग्य प्रमाण राहून पुरेसा ओलावा राहतो. 
  • साच्यामुळे दोन रोपांमधील अंतर व प्रति एकर रोपांची संख्या नियंत्रित करता येऊ शकते. 
  • अगोदरच्या पिकांची मुळे जमिनीत जागेलाच ठेवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब चटकन वाढतो. 
  • मोठ्या प्रमाणात आपोआप गांडुळांचा संचार सुरू होतो. 
  • लावणी नसल्यामुळे पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत नाही. 
  • शेतात साचलेल्या पाण्यात पीक भिजून नुकसान होण्याची शक्‍यता नाही. 

एसआरटी पद्धत निसर्गाशी मिळती जुळती घेणारी आहे. यामध्ये अति पाऊस झाला तरी भात रोपांना काहीच होत नाही. पिकांची पांढरी केशमुळे खोलवर जातात. तसेच दोन गादी वाफ्यांमधील नालीतून अति झालेले पाणी निघून जाते. त्यामुळे पूर आला तरी पिकांवर विपरित परिणाम होत नाही. 
- भक्ती केळकर, एसआरटी सेवक.