esakal | आंबोली घाटात आजपासून एसटी बस धावणार 
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली घाटात आजपासून एसटी बस धावणार 
  • अतिवृष्टीत धोकादायक झालेला आंबोली घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक आजपासून (ता.26) होणार सुरू.
  • याबाबत बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला पत्र. 
  • सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता ए. के. निकम यांची माहिती.  

आंबोली घाटात आजपासून एसटी बस धावणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - अतिवृष्टीत धोकादायक झालेला आंबोली घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक उद्यापासून (ता.26) सुरू करण्यात येणार आहे. तसे पत्र आज बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला दिले आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता ए. के. निकम यांनी दिली. 

आंबोली घाट रस्त्यावरील संरक्षक कठडे कोसळून तसेच मुख्य धबधब्यासमोर रस्ता खचल्याने सात ऑगस्टपासून या मार्गावरील एसटी वाहतुकीसह अवजड वाहतूक पूर्णतः बंद केली होती. खचलेला रस्ता लक्षात घेता धबधब्यासमोर असलेली कॉंक्रीटची भिंत तोडून तेथून छोटी वाहतूक सुरू ठेवली होती. सायंकाळनंतर पूर्णतः वाहतूक बंद होती. अलीकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांसाठी मिनी बसची सोय केली होती. 

आंबोली घाट रस्ता बंद असल्याने कोल्हापूर, बेळगाव येथे जाणारे व्यापारी वर्ग तसेच प्रवाशांचे व मुख्यतः आंबोली, चौकुळ, गेळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक नुकसान सोसावे लागले. होणारी गैरसोय लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी घाट रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करा, असे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. संरक्षण कठडा कोसळून अरुंद झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी दरडीचा काही भाग कापून रस्ता रुंद करण्याच्याही सूचना केल्या होत्या. मंत्री केसरकर यांनी केलेल्या सूचना व जवळ आलेला गणपती उत्सव सण लक्षात घेता बांधकाम विभागाने घाटाची डागडुजी केली आहे. त्यामुळे उद्यापासून या मार्गावरून एसटी पुन्हा धावणार आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकामचे श्री. निकम म्हणाले, ""घाटात कोसळलेल्या संरक्षक कठड्याच्या याठिकाणी बॅरल लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. कोसळलेले संरक्षक कठडे पुन्हा उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. एसटी प्रशासनाने घाटातून वाहतुकीबाबत विचारणा केली होती. त्याअनुषंगाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या मार्गावरून सायंकाळी सातपर्यंत एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्रही एसटी महामंडळाला देण्यात आले आहे.'' 

loading image
go to top