विद्यार्थ्यांसाठी संविधान अभ्यासक्रम सुरू करणार; सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

start constitution course for student uday samant ratnagiri

विद्यार्थ्यांसाठी संविधान अभ्यासक्रम सुरू करणार; सामंत

मंडणगड : ज्या संविधानावर देश चालतो, त्याची माहिती आणि ज्ञान होण्याच्या दृष्टीने आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी संविधान अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला संविधान शिकल्याचे प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मूळ गाव आंबडवे येथील कार्यक्रमात बोलत होते.

सामंत पुढे म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे, याकरिता राज्यशासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार आहे. त्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होणार असून, लवकरच या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणविभागाच्या वतीने आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, पुतळा उभा करणार असून, हा पुतळा आंबडवे येथे कोठे असावा, याचे सार्वमत घ्यावे, असे सूचित केले. जगभरातील अभ्यासक व पर्यटकांना आर्कषणाचे केंद्र ठरेल, असे स्मारक व पुतळा राज्यशासनाच्या माध्यमातून उभा करू, असे आश्वासन या वेळी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित चरित्रखंडाचे प्रकाशन हे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राज्यातील भूमीतच करणार असून त्याचाच एक भाग म्हणून आंबडवे येथे भव्यदिव्य कार्यक्रमात लवकरच करणार असल्याचे त्यानी सांगितले. या कार्यक्रमास अध्यक्ष सुनील सकपाळ, आमदार योगेश कदम, परशुराम कदम, संतोष गोवळे, अण्णा कदम, स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, रमेश दळवी, प्रभू, ग्रामस्थ सुदाम सकपाळ, सुदर्शन सकपाळ, नरेंद्र सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मारकाच्या परिसरात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निधीतून उभ्या करण्यात आलेल्या सभा मंडपाचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सर्व सभासद व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

  • राज्यशासन १५ तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार

  • लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार

  • आंबडवे येथे आंबेडकरांचे स्मारक, पुतळा उभारणार

  • राज्यशासनाच्या माध्यमातून हे उभे करणार

महाविद्यालयाचे संचालन सुयोग्य

मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आंबडवे गावी सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयाचे संचालन सुयोग्य पद्धतीने व्हावे, याकरिता पुढाकार घेतल्याचे सांगत सामंत म्हणाले, महाविद्यालयाच्या विविध समस्या सोडवण्याकरिता उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाविद्यालयाचे विविध प्रश्न, महाविद्यालयास जमीन दान करणाऱ्या देणगीदारांचे प्रश्न यावर जातीने लक्ष घातले आहे. अर्धवट राहिलेल्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीस रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी यादीनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्या मार्गी लावली जाणार आहे.

Web Title: Start Constitution Course For Student Uday Samant Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top