सिंधुदुर्गाला निधी देण्यास कटीबद्ध ः सहकारमंत्री

अजय सावंत
Sunday, 25 October 2020

कॉंग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज कोरोना नियमांच्या अधीन राहून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून विकासनिधी देण्याबाबत जिल्ह्यावर अन्याय होणार नाही. राष्ट्रवादीला समप्रमाणात निधी दिला जाईल. राज्य शासन सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात दिली. 

कॉंग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज कोरोना नियमांच्या अधीन राहून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ओबीसी सेलचे कोकण निरीक्षक राज राजापुरकर, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डॉन्टस, कौसर खान, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा बॅंक संचालक प्रमोद धुरी, सावळाराम अणावकर, आत्माराम ओटवणेकर, सुनील भोगटे, भास्कर परब, शिवाजी घोगळे, सफराज नाईक, पुजा पेडणेकर, चित्रा बाबर-देसाई, संग्राम सावंत, सचिन पाटकर, हार्दिक शिगले, अनंत पिळणकर आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, सेल अध्यक्ष, प्रांतिक सदस्य उपस्थित होते. 

ओबीसी सेलचे कोकण निरीक्षक राजापूरकर म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तळागाळात, घराघरात पोचविण्यासाठी प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे. प्रत्येक विभागाने ती जबाबदारी पेलल्यास आगामी सर्व निवडणुका जिंकण्यास वेळ लागणार नाही. भविष्यात जिल्हा बॅंक जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यरत राहा.'' 

जिल्हाध्यक्ष सामंत म्हणाले, ""जिल्ह्यावर त्यावेळी नारायण राणे पालकमंत्री असताना विकासनिधीसाठी आमच्यावर अन्याय झाला. तेच चित्र शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. आम्हाला आजही महाविकास आघाडी असताना कमी लेखले जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आम्हाला अन्य पर्याय हाती घ्यावा लागेल, असे या पक्षाला निक्षून सांगावे लागेल.'' 

कुडाळकर म्हणाले, ""पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानून अधिकृत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा असल्याने प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. नारायण राणे यांच्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे काम केले. सातत्याने अन्यायाच्या विरोधात लढा दिला. अनेक केसेस अंगावर घेतल्या; मात्र कामाला योग्य न्याय मिळाला नाही, ही खंत सातत्याने वाटत होती. राजकीय काम करताना कुठेतरी वरचढ होईल. पुढे जाऊ नये, यासाठी खच्चीकरण होऊ लागले. या सर्वाला कंटाळून गेली दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त होतो. मी आज प्रवेश केला तो पदासाठी नाही. तुमचा विश्‍वास हवा. पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा जिल्ह्यात रोवणार.''

दरम्यान, शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी श्री. पाटील यांचे स्वागत केले. यावेळी अवधूत मालणकर, संजय भोगटे उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे यांनी सूत्रसंचालन केले. 

कोकणाबाबत पवारांना आदर 
पाटील म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोकणबद्दल आदर आहे. पवार यांनी कोकणात आंबा, फळबागा पर्यटनाला चालना देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. गेली पाच वर्षे विकासाची प्रक्रिया रखडली; मात्र तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोना संकटातही राज्यातील जनतेची काळजी घेणारी महाविकास आघाडी ठरली आहे. 

महिला हॉस्पिटलचा प्रश्‍न सोडवू 
भविष्यात कोकणात विकासासाठी समप्रमाण निधी देण्यासाठी श्री. पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. येथील महिला हॉस्पिटलचा प्रश्‍न आरोग्यमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आज तुम्ही पक्ष प्रवेश केला. निश्‍चितच सन्मान मिळेल. यापुढे पक्षवाढीसाठी व येथील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यात येईन, असे पाटील म्हणाले. 

यांनी केला प्रवेश 
सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस सेवा फाऊंडेशन अध्यक्ष काका कुडाळकरांसह कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सर्फराज नाईक, अपंग सेवा संघाचे संजय शिर्के, हितेश कुडाळकर, शैलेश पावसकर, पांडुरंग मेस्त्री, विशाल निकम, साजिद दोस्ती, जावेद नाईक, रेहान शेख, आसिफ खुल्ली, मोमीन दोस्ती, जयराम डिगसकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state co-operation minister said that funds will be given to Sindhudurg