state government budget people cote sindhudurg district
state government budget people cote sindhudurg district

कोकणच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) ः महाराष्ट्र राज्य सरकारच्या 2021-22 चा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प कोकणच्या विकासाला दिशा देणारा आहे, असा सूर सिंधुदुर्गातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. यातील काही निवडक प्रतिक्रीया... 

काही जुन्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी केलेली तरतुद आणि विशेषतः मुंबई या देशाच्या राजधानीसाठी मुलभूत सुविधांचा अर्थसंकल्पात प्राधान्याने विचार केलेला जाणवतो. येणारी मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्तेतील प्रमुख पक्ष शिवसेनेचाच प्रभाव जाणवतो.

कोरोनासारख्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे विभागवार केलेल्या तरतुदीची अमंलबजावणी कोणत्या मार्गाने होणार आणि महसुली तुट कशी भरुन काढली जाणार हे अस्पष्ट आहे; मात्र आरोग्यासाठी केलेली तरतुद पहाता कोरोनाच प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटले हे निश्‍चित. देशपातळीवर चाललेलं शेतकरी आंदोलन विचारात घेऊन शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी कशी होते हे पहाणे महत्त्वाचे ठरेल. 
- ऍड. नकुल पार्सेकर, सामाजिक कार्यकर्ते. 

कोरोनाच्या संकटातील एक आश्‍वासक आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प- महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषी क्षेत्र, परकीय व्यापारात अग्रेसर असलेले औद्योगिक क्षेत्र, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करणारे शिक्षण, अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखले जाणारे दळणवळण क्षेत्र, पर्यटन अशा क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्याबरोबरच महिलांसाठी विविध योजना राबवत त्यांना सबलीकृत करण्यासाठीचा, आदिवासी, अल्पसंख्यांक व इतर मागास प्रवर्गासाठी कार्य करणाऱ्या सारथी बार्टी यासारख्या संस्थांना प्रबलीकृत करण्यासह, नगर विकास, सहकार पणन यासारख्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करून सर्वसमावेशक वृद्धी साध्य करण्यासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रात महाविकास घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 
- केदार म्हसकर, सहाय्यक शिक्षक 

शेती आणि मत्स्य उद्योगासाठी अर्थसंकल्प फायदेशीर आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी योजनेच्या माध्यमातून फायदा होणार आहे. कोरोनानंतर सादर केलेला एक चांगला अर्थसंकल्प; मात्र अंमलबजावणी न झाल्यास अर्थसंकल्पाचे निगेटीव्ह परिणाम जाणवतील. त्यामुळे तरतुदींवर भर देणे आवश्‍यक आहे. पर्यटनासाठी आणखी काही गोष्टींची तरतूद होणे आवश्‍यक होते. आरोग्यासाठी काही सकारात्मक बाबींचा विचार या अर्थसंकल्पातून झाला आहे; मात्र रोजगाराच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्ष झाले आहे. 
- ज्ञानदीप मयेकर, नोकरदार 

सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य, शेती, तसेच परिवहन यामध्ये भरघोस तरतूद करण्यात आली आहे; परंतु कोरोनाचा झालेला छोट्या व्यावसायिकांवरील परिणाम लक्षात घेता व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल अशा भक्कम तरतुदीचा अभाव दिसतो. त्यावर योग्य तरतूद झाली असती तर आर्थिक विवंचनेत अडकलेल्या मध्यम व्यावसायिकांना त्याचा लाभ झाला असता. 
- राहुल राणे, छायाचित्रकार 

शेती कर्जावरील व्याज राज्य सरकार भरणार आहे. मत्सद्योगासाठी 100 कोटीचा निधी, इंधनावरील राज्य सरकारच्या करातील कपात, जलसिंचनासाठी निधी या अर्थसंकल्पातील स्वागतार्य बाबी म्हणता येतील. शेतकऱ्यांना दिलासा देणारे बजेट आहे. 
- ऍड. संदीप निंबाळकर 
 

रेडी रेवस मार्ग, "सिंधु-रत्न' योजना, मेडिकल कॉलेजसाठी केलेल्या तरतुदीमुळे कोकण विकासाला दिशा मिळेल; परंतु हा अर्थसंकल्प समतोल व महाराष्ट्रातील सर्व भागांना न्याय देणार आहे. शिक्षण कृषी क्षेत्रालाही फायद्याचा आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवास ही चांगली तरतूद आहे. 
- डॉ. दिनेश नागवेकर, बांधकाम व्यावसायिक 

"सिंधुरत्न' योजना ही सिंधुदुर्गाच्या विकासाला गती देणारी ठरेल. या योजनेंतर्गत युवकांना रोजगाराभिमुख कार्यक्रम हाती घेतल्यास परजिल्ह्यात व परराज्यात युवकांच्या होणारे स्थलांतर थांबू शकते. बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवास मिळाल्याने मुलींसाठी एक नवी ऊर्जा देणारा अर्थसंकल्प सिंधुरत्नवर योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच उद्दीष्ट साध्य होईल. 
- मनाली तानावडे, महाविद्यालयीन विद्यार्थिनी. 

सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. सिंधुरत्न योजना निश्‍चितच लाभदायी ठरेल. रेडी मार्ग हा जिल्ह्याच्या भविष्यातील एक चांगली नांदी आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे. 
- जयंत बरेगार, पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com