गोव्यातून आणायचा अन् घरात साठा करायचा, छापा पडताच भांडाफोड

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

फोंडा घाट येथे संशयित प्रसाद नराम हा गोवा बनावटीच्या दारूचा साठा करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाचे प्रभारी निरीक्षक गणेश यादव यांना मिळाली होती.

कणकवली (सिंधुदुर्ग) - गोवा बनावटीची दारू घरात साठवणूक केल्याप्रकरणी फोंडाघाट येथे छापा टाकून एकावर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. संशयिताकडुन 2 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल (ता.7) रात्री उशिरा झाली. प्रसाद महादेव नराम (रा. फोंडा हवेलीनगर), असे त्यांचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी, की फोंडा घाट येथे संशयित प्रसाद नराम हा गोवा बनावटीच्या दारूचा साठा करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाचे प्रभारी निरीक्षक गणेश यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्काच्या पथकाने काल रात्री सापळा रचून नरामच्या घरी हवेलीनगर येथे छापा टाकला. यावेळी सुमारे अडीच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. संशयितास येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stocks of liquor confiscated from the house phondaghat konkan sindhudurg