पॅरासिलिंग रोखा, पारंपारिक मच्छीमारांना जगू द्या

0
0

वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) : शिरोडा - वेळागर येथे पॅरासिलिंगमुळे स्थानिक मासेमारीवर परिणाम होत असल्याने शिरोडा-केरवाडा येथील सुमारे 600 ते 700 मच्छीमारांनी शुक्रवारी मासेमारी व्यवसाय बंद ठेवत वेळागरमध्ये आंदोलन केले. या प्रश्‍नी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून तोडगा न निघाल्यास संघर्षाची ठिणगी पडेल, असा इशाराही मच्छीमारांनी दिला. 

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार वेळागर येथे होत असलेल्या पॅरासिलिंगच्या मशीनला मोठी पॉवर आहे. त्यामुळे समुद्र ढवळून निघतो. त्याचा मासेमारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या विरोधात वर्षभरापूर्वी आवाज उठवला होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउननंतर पुन्हा पॅरासिलिंग सुरू झाले आहे. त्यामुळे काही मच्छीमारांनी त्याविरोधात पुन्हा आवाज उठवला. मच्छीमारांवर संबंधितांनी दावे दाखल केल्याने आज संतप्त मच्छीमार वेळागर येथे एकवटले. 

यावेळी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच रवी पेडणेकर, माजी उपसरपंच वासुदेव पेडणेकर, सुनील साळगावकर, संजय उगवेकर, दिलीप नाईक, आपा साळगावकर, विद्याधर मसुरकर, गोट्या परब यांच्यासह सुमारे 600 ते 700 मच्छीमार महिला पुरुष उपस्थित होते. आंदोलनाला भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांनी भेट देऊन मच्छीमारांशी चर्चा केली. 

यावेळी मालवण येथे एलईडीचा विषय असो किंवा येथील येथील पॅरासिलिंगचा यामुळे मच्छीमार उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्याविरोधातील लढ्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सुहास गवंडळकर यांनी सांगितले. पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यावतीने या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना वॉटर स्पोर्टस्‌ मालकाकडून मच्छीमारांना डिवचण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. शिवसेना म्हणून आम्ही नेहमीच मच्छीमारांच्या पाठीशी असल्याचे यशवंत ऊर्फ बाळू परब यांनी सांगितले. 


मेरिटाईम बोर्डने परवानगी दिलेल्या वॉटर स्पोर्टस्‌ला आमचा कोणताही विरोध नाही; मात्र यातील पॅरासिलिंगमुळे मासेमारीला मोठा परिणाम होतो. याविरोधात आमचा लढा शांततेतच सुरू होता; मात्र आता जीवन मरणाचा प्रश्‍न असल्याने कधी उद्रेक होईल, हे सांगता येत नाही. आम्ही आजपर्यंत सर्व पक्षांकडे गेलो; मात्र या गोष्टीचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सर्व पक्षांना केरवाडीचे दरवाजे बंद राहतील.'' 
- वासुदेव पेडणेकर, माजी उपसरपंच 


आंदोलन कोणा एका व्यक्तीच्या, व्यवसायाविरोधात नाही. मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर गदा आणणाऱ्यांविरोधात आहे. मच्छीमारांच्या एकजुटीसमोर कोणतीही ताकद टिकू देणार नाही. पॅरासिलिंग बंद झालेच पाहिजे.'' 
- मनोज उगवेकर, सरपंच, शिरोडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com