गाळेल परिसराला चक्रीवादळाचा तडाखा, तासभर मुसळधार

storms heavy rain konkan sindhudurg
storms heavy rain konkan sindhudurg

बांदा (सिंधुदुर्ग) - गाळेल, डिंगणे, डोंगरपाल परिसराला शुक्रवारी (ता. 19) रात्री उशिरा चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. वादळी वारा व मेघगर्जनेसह तब्बल तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने काजू, सुपारी, आंबा, माड मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले. काजू हंगामाच्या तोंडावरच अपरिपक्‍व पीक गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

कृषी विभाग वगळता महसूल प्रशासनाचे अधिकारी आज पंचनामा करण्यासाठी न फिरकल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही; मात्र स्थानिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गाळेल गावाला बसला. गाळेल-मधलीवाडी येथील शेतकरी प्रवीण अनंत नाडकर्णी यांच्या आंबा, काजू बागायतीचे सर्वाधिक नुकसान झाले. डिंगणे, गाळेल गावात काजूचे 100 टक्के उत्पादन घेण्यात येते.

येथील काजू चविष्ट असल्याने त्याला बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असते; मात्र हंगामाच्या तोंडावरच अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. श्री. नाडकर्णी यांच्या काजू बागायतीतील झाडे उन्मळून पडण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात काजू बीची गळ झाली आहे. सुपारी, माड, आंबा मोठ्या प्रमाणात उन्मळून पडल्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे.

जाम, पपई झाडेदेखील जमीनदोस्त झाली. अनेक बागायतीत काजू बीचा खच पडला आहे. मोहोराने फुललेली कित्येक काजूची झाडे मुळासह उन्मळून तर काही मोडून पडली आहेत. माड, सुपारी झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. दोन्ही गावांत अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्‍टरवरील काजू पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे. डिंगणे उपसरपंच जयेश सावंत यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी केली आहे. 

महसूल विभागाने फिरवली पाठ 
शेतकऱ्यांनी आज सकाळी बागा गाठल्या तेव्हा मोठ्या नुकसानीची कल्पना आली. त्यांनी तातडीने महसूल व कृषी विभागाला माहिती दिली. दिवसभरात कृषी सहायक अतुल माळी यांनी गाळेल येथे येऊन नुकसानग्रस्त झाडांची पाहणी केली. दिवसभरात महसूल विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही.

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com