बागायतदार धास्तावले; गारांच्या माऱ्याने हापूस डागाळला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

चार दिवसांपूर्वी अवकाळी मुसळधार पावसासह पडलेल्या गारांनी हापूसवर संक्रात आली आहे. फेब्रुवारीत गारांचा पाऊस कोकणात कधीच झालेला नाही.  बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत.

रत्नागिरी - बदलत्या वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदारांना चार दिवसांपूर्वी पडलेल्या गारांच्या पावसाने दणका दिला. रत्नागिरी तालुक्‍यातील करबुडे, वेतोशीही आजूबाजूच्या परिसरातील बागायतींमधील सुपारीएवढ्या कैरीवर गारा पडल्यामुळे त्या डागाळल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांची माहिती घेण्याच्या सूचना कृषी विभागाकडून तालुकास्तरावर दिल्या आहेत. 

चार दिवसांपूर्वी अवकाळी मुसळधार पावसासह पडलेल्या गारांनी हापूसवर संक्रात आली आहे. फेब्रुवारीत गारांचा पाऊस कोकणात कधीच झालेला नाही.  बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. रत्नागिरी तालुक्‍यात करबुडे, वेतोशी, नेवरेसह लांजा तालुक्‍यात पालू आणि परिसरात गारा पडल्या. नोव्हेंबर, डिसेंबर कालावधीत आलेल्या मोहोराला फळधारणा होत आहे. अनेक ठिकाणी सुपारीएवढी कैरी लागलेली आहे. या अवस्थेत मुसळधार पावसासह गारा पडल्यामुळे त्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरीत गारांचा आकार मोठा होता. त्या वेगाने कैरीवर येऊन आदळल्याने नुकसान झाले आहे. कैऱ्यांवर डाग पडलेले आहेत. डागाळलेल्या कैरीचा भाग कुजण्याची शक्‍यता आहे. करबुडे, वेतोशी परिसरात असलेल्या आंबा बागायतदारांना गारांमुळे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

यंदा आंबा उशिराने आणि कमी राहणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामध्ये गारांनी केलेल्या नुकसानीने बागायतदारांचे आर्थिक गणितच कोलमडण्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांचा मारा करण्याशिवाय बागायतदारांपुढे पर्याय उरलेला नाही. पावसामुळे नुकसान झाले असले तरीही आवश्‍यक भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अशक्‍य आहे. राज्यात सगळीकडेच गारांचा पाऊस झाला असल्याने सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. रत्नागिरीतही बाधित बागायतदारांची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना तालुकास्तरावर प्राप्त झाल्या आहेत. 

विम्याच्या लाभाबाबत साशंकता 
अंबिया बहारसाठी विमा योजना यंदा लागू केली आहे; परंतु त्याचे निकष बदलण्यात आल्याने यंदा नुकसान होऊनही लाभ मिळणे अशक्‍य आहे. सलग 25 मिलीमीटर पाऊस पडला तर लाभासाठी शेतकरी पात्र ठरणार आहे. चार दिवसांपूर्वी बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरीही 25 मिमी नोंद झालेली नाही. त्यामुळे परतावा मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरणे अशक्‍य आहेत. 

गारा पडलेल्या परिसरातील बागांमध्ये कैरीची स्थिती गंभीर आहे. याची दखल शासनाने घेतली पाहिजे. यंदा वातावरणातील बदलामुळे पीक कमी राहणार आहे, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. 
- राजेंद्र कदम, बागायतदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stormy Rains Damage Hapus Crop Mango Growers in Tension

टॉपिकस
Topic Tags: