आजोबांच्या स्वप्नांसाठी नातीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

खेळायचे, बागडायचे असते, त्याच वयात तिच्या वाट्याला संघर्षमय परिस्थितीचे जगणे आले

खेड : आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही परिस्थितीपुढे गुडघे न टेकता, तालुक्‍यातील आंबवली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी चैताली यादव हिने दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण प्राप्त करत उत्तुंग यशाला गवसणी घातली. माता, पित्यांच्या अपघाती निधनानंतर वयाच्या ५ व्या वर्षीच चैताली पोरकी झाली. खेळायचे, बागडायचे असते, त्याच वयात तिच्या वाट्याला संघर्षमय परिस्थितीचे जगणे आले. ७५ वर्षीय आजोबा नरेश यादव यांनी या परिस्थितीत खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहत चैतालीला आई-वडिलांची जराही उणीव भासू दिली नाही.

हेही वाचा - चाकरमान्यांचा गणेशोत्सव यंदा मुंबईतच; ई-पाससाठी पोलिसांकडे केवळ 4 हजार अर्ज...

लहान वयापासूनच हुशार असलेल्या चैतालीने प्रशालेतील विविध स्पर्धांसह खेळामध्ये नैपुण्य प्राप्त करत प्रत्येकवेळेला यशाची मोहोर उमटवली. प्रसंगी पोटाला चिमटे काढत शिक्षण घेणाऱ्या चैतालीने कुठल्याही प्रकारच्या खासगी शिकवण्या न लावता दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत इतरांसमोर आदर्श निर्माण केला. आजोबा नरेश यादव यांनीही चैतालीसाठी अपार कष्ट उपसत नातीला खूप शिकवण्याची खूणगाठच मनी बांधली.

नातीला उच्च विद्याविभूषित करण्याचा ध्यास उराशी बाळगणाऱ्या आजोबांनी पै-पै गाठीला बांधत तिच्या शिक्षणाचा भार समर्थपणे पेलला. चैतालीनेही जिद्द, चिकाटीच्या बळावर प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या भक्कम पाठबळामुळे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत आजोबांनी उपसलेले अपार काष्ट सार्थकी लावले आहेत. वक्तृत्व स्पर्धेत तिने अनेक पारितोषिके मिळवली. खो-खोतही ती निपुण आहे. चैतालीने इंग्रजीत ९९ गुण मिळवले.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये सर्वाधिक झळ या व्यवसायिकांना...

शिक्षणासाठी मदतीची गरज पुढे खूप शिकून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्‍टर किंवा सनदी अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा तिने उराशी बाळगली आहे. तिच्या या महत्त्वाकांक्षेला सत्यात उतरवण्यासाठी दानशूरांनी सढळ हस्ते मदत करायला हवी.

"यश प्राप्त करण्यासाठी अभ्यासात झोकून देणे गरजेचे आहे. शिक्षक जे-जे सांगतील, त्याची आज्ञाधारकपणे अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच हे उत्तुंग यश मिळवता आले."

- चैताली यादव

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of 10th standard school girl chaitali yadav and her success