परशुराम भूमीतील श्री भवानी वाघजाई मातेचा इतिहास तुळजापुरच्या भवानीशी

नागेश पाटील
Monday, 19 October 2020

चिपळूणपासून सात किमीवर वसलेलं टेरव गावातील श्री. कुलस्वामीनी भवानी - वाघजाई मंदिरास साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. 

टेरव (रत्नागिरी) : खरतर कोकणातील प्रत्येक मंदिराची एक वेगळी शैली असते. कौलारु मंदिर, देखणी ग्रामदेवतेची मूर्ती असं काहीसं पारंपारिक चित्र कोकणातील प्रत्येक मंदिराबद्दल प्रत्येकाच्या मनात असते. चिपळुन तालुक्यातील टेरव येथील पुर्ण काँक्रीटचे संगमरवरी पण तरीही लाल तांबड्या मातीतील खरे वैभव असणारे टेरवचे श्री भवानी वाघजाई मंदिर. भवानी मातेवर येथील स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांची श्रद्धा आहे. 

निसर्गरम्य परिसर आणि भवानी-वाघजाईच्या लौकिकामुळे जिल्ह्यासह राज्यातील भाविकसही दर्शनासाठी येत असतात. मात्र नवरात्रोत्सव काळात कोरोनामुळे यावर्षी हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. चिपळूणपासून सात किमीवर वसलेलं टेरव गावातील श्री. कुलस्वामीनी भवानी - वाघजाई मंदिरास साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. 

हेही वाचा - एक जणाचा प्लाझ्मा देतो चार जणांना जीवनदान -

मंदिराची बांधणी म्हणजे अस्सल कोकणच्या लाल तांबड्या मातीतील वास्तुशिल्पाचा नमुना. पुर्वी टेरव ग्रामस्थांचं हे भवानी आणि वाघजाई मंदिर हे देवरहाटीत होते. स्थानिक ग्रामस्थ आणि अनेक देणगीदारांच्या योगदानातून मंदिराचा जिर्णोद्धार झाला. यातून एक भव्य देखणं वास्तुशिल्प उभे राहीले. मंदिराचे बांधकाम नवे असले तरी परशुराम भुमितील या भवानी मातेचा इतिहास तुळजापुरच्या भवानीशी नाते सांगणारा आहे.
 

दोन हजार भाविक एकाचवेळी बसतील अशा विशाल सभामंडपाचे हे दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराच्या चारही गाभा-यावर दाक्षिणात्य घाटाचे गोलाकार कळस आहेत. मंदिराला दोन महाद्वारे आहेत. या मंदिराच्या संपुर्ण बांधकामावर नक्षीदार कोरीव काम, वीणाधारी स्त्री, मृदुंगधारी वादक, नृत्य अप्सरा, ध्यानस्थ देवी, गवाक्षावर मोर, कपोत, हंस, विष्णुच्या दशावतारी चित्रांची कोरीव शिल्पे मनाला भुरळ घालणारी आहेत. हाती आयुध असलेली, महिषासुराचा वध करणारी तुळजाभवानीची मुर्ती काळ्या निलम पाषाणातील असुन उडपी येथून बनवून घेतली. 

हेही वाचा -  प्रस्तावित बांदा-संकेश्‍वर महामार्ग होणार तरी कसा?

 मंदिर परिसरात भवानी - वाघजाई सोबत अन्यही देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात सात पुष्पवाटीका, अर्धवर्तुळाकार उद्यान, देवराईची हिरवाईमुळे  प्रसन्नतेस भर पडते. गावक-यांचा पालखीसोहळ्याच्या निमित्तानं हे मंदिर गजबजुन जाते. देवी वाघजाई व्याघ्रावर आरूढ झालेली असून अष्ठभुजा धारिणी आहे. 
टेरव गावची जागृत ग्रामदेवत आहे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. एक वरद हस्त असून एक जागृत देवता आहे. तिला व्याघ्रेश्वरी किंवा व्याघ्राम्बरी असेही म्हणतात.

चिपळूण तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ व जंगलमय आहे. त्यामुळे इथे वाघांचा त्रास अधून मधून जाणवायचा. बहुसंख्य लोक शेतकरी असल्यामुळे वाघ पासून आपले व आपल्या गुरा वासरांचे संरक्षण व्हावे आणि ते आई वाघजाईच करू शकते, अशी लोकांची धारणा असून तिच्यावर नितांत श्रद्धा व विश्वास आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of bhavani waghjai temple from chiplun terav ratnagiri describe its histrory navratri special story