सिंधुदुर्गात पोलिस यंत्रणेवर ताण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

याचबरोबर जिल्हा अंतर्गत वाहतूक आणि अनावश्‍यक फिरणारे नागरिक यांना रोखण्यासाठी पोलिस जागता पहारा देत आहेत

कणकवली (सिंधुदुर्ग) -  "कोरोना' च्या महामारीला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्परतेने सेवा बजावत असली तरी, खऱ्या अर्थाने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सेवा बजावणारे पोलिस कर्मचारी एका तणावाखाली येऊ लागले आहेत. रस्त्यावर उभे राहून अनावश्‍यक फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना उन्हातानात पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा बजावावी लागत आहे. 

जिल्हा पोलिस दलाला गोवा राज्य आणि कर्नाटकच्या सीमेबरोबरच रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर 24 तास पहारा द्यावा लागत आहे. त्यातच गोव्याहून जाणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवावी लागत आहे. गोवा बनावटीची दारू सहजपणे आजही परजिल्ह्यात वाहतूक केली जात आहे. याचबरोबर जिल्हा अंतर्गत वाहतूक आणि अनावश्‍यक फिरणारे नागरिक यांना रोखण्यासाठी पोलिस जागता पहारा देत आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कसा कर्मचाऱ्यांचा रिक्त जागांचा आलेख मोठा आहे. त्यामुळे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे थोडाफार दिलासा पोलीस यंत्रणेला मिळाला आहे. तरीही गेले पंधरा दिवस कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने सरसावली आहे. पोलिस यंत्रणा सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सातत्याने रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी करणे अनावश्‍यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याने दंडात्मक रक्कम वसूल करणे असा सपाटा सुरू झाला आहे. याचबरोबर वरिष्ठांचा मोठा दबाव आहे. 

एका वरिष्ठाची झाली बदली 
जिल्ह्यातील एका पोलिस चेकनाक्‍यावर कर्तव्य न बजावण्याचा ठपका ठेवत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची तडफातडफी बदली करण्यात आली आहे. त्या चेकनाक्‍यावर एका नागरिकाला तो रडत असल्याने आणि त्याची गरज ओळखून त्याला पुढे जाण्यास परवानगी दिली होती; पण दुसऱ्या नाक्‍यावर त्या नागरिकाला अडविले आणि याची शिक्षा म्हणून त्या अधिकाऱ्याला अखेर वरिष्ठांच्या आदेशाने बदलीला सामोरे जावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stress on the police konkan sindhudurg