तिलारीला अभय; मात्र संवर्धन राखीव क्षेत्राची काटेकोर अमंलबजावणी आवश्‍यक 

Strict Implementation Of Conservation Reserve Area Needed In Tilari Reserve Forest
Strict Implementation Of Conservation Reserve Area Needed In Tilari Reserve Forest

संवर्धन राखीव क्षेत्र तिलारीत जाहीर झाल्याने तिलारीच्या अरण्य क्षेत्रातील वन्यजीवांना आता अभय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुर्मिळ पशुपक्षी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर केले आहे ; मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्‍यक आहे. 

समृध्द परिसर 
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या हत्तींचे कळप तिलारी खोऱ्यात आहेत. शिवाय अनेक कारणामुळे नामशेष होणारा वाघही येथे आहे. हत्ती, वाघ यांचे प्रजोत्पादन त्या परिसरात होत असल्याने त्या प्रजातींचे संरक्षण करणे शासनाची जबाबदारी आहे. शिवाय बिबटे, लश्ररलज्ञ रिपींहशी, अस्वल, सांबर,पिसय, पिसोरी, रानडुक्कर, किंग कोब्रा, गवा, भेडकी, चौशिंगा,विविध जातीची फुलपाखरे, दुर्मिळ पक्षी, दुर्मिळ वनौषधी, दुर्मिळ फुले आणि औषधी वनस्पतीं यांच्या वास्तव्याने तो परिसर समृद्ध आहे. त्या परिसरात जवळपास एकोणीस प्रकारच्या सस्तन प्रजाती, बारा उभयचर प्रजाती, एकाहत्तर प्रकारचे पक्षी,साठ प्रकारची फुलपाखरे, विविध प्रकारचे विंचू, कोळी, सोळा प्रकारचे सरपटणारे प्राणी एका सहा दिवसांच्या सर्वेक्षणादरम्यान आढळले.

ती अचंबित करणारी जीवसृष्टी पाहता तिलारीचे समृध्द जंगल जगातील नामांकित जंगलांशी जैववैविध्यतेमध्ये नक्कीच बरोबरी करू शकेल असेच आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली ही नक्कीच समाधानाची बाब आहे.तिलारीतील वन्यजीव आणि वनसंपदा टिकावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना या अधिसूचनेमुळे दिलासा मिळाला. तरीही त्यांच्यापैकी अनेकांना तिलारी केवळ संवर्धन राखीव क्षेत्र होवून चालणार नाही तर त्याला अभयारण्याचा दर्जा मिळावा असे वाटते. त्यासाठी कदाचित त्यांचा नवा लढाही अस्तित्वात येईल.

तूर्तास वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आणि वाघ व हत्तींचा कॉरिडॉर प्रत्यक्ष संरक्षित होण्यासाठी मात्र कृती आराखड्याची गरज आहे. तिलारी खोऱ्यात पाच ते सहा हत्ती आहेत, त्यातील केर भेकुर्ली, मोर्ले, सोनावल, घाटीवडे, बांबर्डे परिसरात फिरणारा टस्कर लोकांच्या म्हणण्यानुसार आक्रमक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हत्ती पकड मोहीम राबवली जाऊ शकते. अर्थात त्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया वनविभागाला पूर्ण कराव्या लागतील. 

अशी आहे पार्श्‍वभूमी 
पश्‍चिम घाट जैव समृद्ध आहे. सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोलीपासून दोडामार्गमधील विर्डीपर्यंतचा भाग आणि त्याशिवाय कर्नाटक आणि गोव्यातील पश्‍चिम घाटातील भाग ही पर्यावरणदृष्ट्‌या समृद्ध आहे. शिवाय तोच भाग वाघ आणि अन्य दुर्मिळ प्राण्यांचा कॉरिडॉर आहे. तो जतन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेब्रुवारीत जिल्ह्यात आले होते. त्यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी तिलारी परिसर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. शिवाय तेजस उद्धव ठाकरे हेही पर्यावरणाच्या बाबतीत खूपच संवेदनशील आहेत. त्यांनी मुख्य वनसंरक्षक व्ही. क्‍लेमेंट बेन यांच्यासोबत तिलारी परिसराची पाहणी करुन वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तो परिसर राखीव ठेवण्याची आत्यंतिक गरज बोलून दाखवली होती अशी चर्चा आहे. योगायोगाने त्यांचे भाऊ आदित्य राज्याचे पर्यावरणमंत्री आहेत. त्या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून तिलारीचा परिसर राखीव घोषित झाला आहे. 

अभयारण्य प्रस्तावीत होते पण... 
तिलारी परिसरात अभयारण्य करण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपुर्वीच राज्याकडे गेला आहे. त्यावर युती शासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने तो पडून आहे. दुसरीकडे विद्यमान सरकारने अभयारण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा 22 जुनला अधिसूचना काढून केली. त्यामुळे त्या परिसरातील वन्यजीव, दुर्मिळ वनस्पती यांना वन्यजीव संरक्षण कायद्याने संरक्षण मिळणार आहे.अर्थात संवर्धन राखीव क्षेत्र केवळ कागदावर राहून चालणार नाही तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. 

काय आहे फरक? 
एका वनाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार संवर्धन राखीव क्षेत्र आणि अभयारण्य यात फारसा फरक नाही. अभयारण्य जाहीर झाले असते तर खासगी क्षेत्र संपादित करावे लागले असते. आता केवळ वनक्षेत्रच राखीव ठेवण्यात आले आहे.पुर्वी त्या क्षेत्राला भारतीय वन कायदा लागू होता, आता वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला आहे. संवर्धन राखीव क्षेत्र आणि अभयारण्य यांच्यासाठी असलेल्या कायद्यातील तरतुदी कमीजास्त प्रमाणात तशाच आहेत,फारसा फरक नाही असेही त्या वनाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

अभयारण्याची घोषणा आवश्‍यक 
तिलारीचा संपूर्ण परिसर पर्यावरणदृष्ट्‌या समृद्ध आणि संवेदनशील आहे.वाघ, हत्ती, बिबट्या आणि अन्य वन्यजीवांचे प्रजोत्पादन या परिसरात होते. राखीव क्षेत्राची घोषणा झाली असली तरी त्यातून केवळ 29.53 चौरस किलोमीटर एवढेच क्षेत्र राखीव (संरक्षित) झाले आहे. वन्यप्राण्यांचा वावर आणि त्यांची वाढती संख्या पाहता हे क्षेत्र फारच कमी आहे. त्यासाठी अभयारण्य घोषित होण्याची गरज आहे. 

शिकारीवर निर्बंध हवे 
त्या परिसरात वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. गोव्यात मांसांची मागणी मोठी असल्याने स्थानिक आणि गोव्यातील शिकारी मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांची शिकार करुन मांसविक्री करतात. त्यांच्यावर कडक कारवाई आवश्‍यक आहे. 

वृक्षतोड, अतिक्रमण रोखण्याचे आव्हान 
तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र आणि वनसंज्ञा असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड होते .शिवाय तिलारी प्रकल्पाने संपादित केलेल्या सरकारी जागेत आणि वनजमिनीवर काही स्थानिक आणि काही केरळीयन लोकांनी अतिक्रमण केल्याच्या चर्चा आहेत. वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने त्या बाबी अतिगंभीर असल्याने वृक्षतोड आणि अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस कृतीची गरज आहे. 

'त्या' क्षेत्रात प्रवेश बंदी 
तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील केंद्रे खुर्द, केंद्रे बुद्रुक, पाट्ये, शिरंगे या गावातील वनक्षेत्रासह आयनोडे,मेढे, कोनाळ, बांबर्डे ,हेवाळे आणि घाटीवडे या गावातील एकूण 29.53 चौ. किमी.क्षेत्र (2953.377 हेक्‍टर) तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.जनतेच्या माहितीसाठी राजपत्रात राखीव क्षेत्राचे सर्व्हे नंबर दिले आहेत.त्यामुळे या क्षेत्रात आता कुणालाही कोणत्याही उद्देशासाठी विनापरवाना प्रवेश करता येणार नाही;खासगी क्षेत्रात मात्र प्रवेशबंदी नाही. 

डॉलर कमावण्याची संधी 
राखीव क्षेत्र घोषित झाल्याने तालुक्‍यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जंगल सफारीसाठी तिलारी जलाशयातील पहिली बोट वनविभागाने खरेदी केली आहे. तशाच बोटींच्या माध्यमातून आणि जंगल भागात पदभ्रमण करुन, कृषी पर्यटन, पशुपक्षी निरीक्षण आदींच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करता येणार आहे. देशी विदेशी पर्यटकांना तिलारीचा समृद्ध परिसर दाखवून त्यातून डॉलरची कमाईही बेरोजगार युवक युवतींना करता येणार आहे. 

"" सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग वन परिक्षेत्रातील 29.53 चौरस किमी क्षेत्र हे 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र' (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित केले आहे. वन विभागाने आज त्यांसदर्भात अधिसूचना काढून हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिलारी परिसरातील समृद्ध जैवविविधता संवर्धित होणार आहे. तसेच तिथला वाघ आणि हत्तींचा महत्त्वाचा वन्यजीव भ्रमणमार्गाचेही रक्षण होणार आहे. शिवाय या परिसराला 'संवर्धन राखीव क्षेत्रा' चा दर्जा मिळाल्याने या जागेच्या संवर्धनाबरोबरच निसर्ग पर्यटनालाही चालना मिळणार आहे.'' 
- अमित सुतार, वन्यजीव अभ्यासक 

"" संपूर्ण दोडामार्ग तालुक्‍यातच वृक्षतोड बंदी आहे. ती राखीव क्षेत्रातही आहे. शिवाय त्या परिसरातील वन्यजीवांना धोका पोचवणे, त्यांना इजा करणे, वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांचे मांस, कातडे, शरीर किंवा त्याचे अवयव विकणे, तस्करी करणे यालाही वन्यजीव संरक्षक कायद्याने आता पूर्णतः बंदी घातली आहे. त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना माहिती देऊन वन्यप्राणी आणि वनसंपदा जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.'' 
- समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक, सावंतवाडी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com