जिल्ह्यात परीक्षेविना 70 हजार जण होणार पास 

विनोद दळवी
Thursday, 8 April 2021

परीक्षा न घेणे हा निर्णय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी मुलांच्या बौद्धीक क्षमतेवर परिणाम करणार असल्याच्या प्रतिक्रिया पालक व शिक्षण तज्ज्ञांमधून उमटत आहेत. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - गतवर्षीप्रमाणे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यावर्षीही कोरोना पावला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याच्या राज्याच्या घोषणेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 69 हजार 715 विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. परीक्षा न घेणे हा निर्णय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी मुलांच्या बौद्धीक क्षमतेवर परिणाम करणार असल्याच्या प्रतिक्रिया पालक व शिक्षण तज्ज्ञांमधून उमटत आहेत. 

देशात गतवर्षी दाखल झालेल्या कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या मुलांना पास करण्यात आले होते. त्यांच्या अंतिम परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. आताही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढू नये, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचबरोबर शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे.

कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. परीक्षा न होता पास होणार असल्याने यावर्षीही या विद्यार्थ्यांना कोरोना पावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे 69 हजार 715 एवढे विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी पास होणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व शाळा बंद ठेवण्याचा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. दरम्यान, या कालावधीत केवळ दहावी व बारावीच्याच परीक्षा होणार आहेत. 

 

लॉकडाउनमुळे विद्यार्थी अनेक महिने घरात आहेत. त्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू असले तरी त्यात त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पहिली ते चौथी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्यांच्या परीक्षा गरजेचे आहे. 
- दिगंबर पालव, पालक. 

ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात 
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा रद्द करून त्यांना पास करणे हा शासनाचा उपाय एका दृष्टीने चांगला आहे; मात्र परीक्षा न घेतल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धीक विकासावर होणार आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे शक्‍य नसल्यास ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात, अशीही मागणी काही शिक्षण प्रेमी करत आहेत. 

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या 

*वर्ग*विद्यार्थी संख्या 
*पहिली*7471 
*दुसरी*7471 
*तिसरी*8768 
*चौथी*8607 
*पाचवी*8791 
*सहावी*9572 
*सातवी*9336 
*आठवी*9699 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student exam issue sindhudurg district