esakal | कोकणात शिलालेख नव्याने आढळल्यास अभ्यास आवश्‍यक  :  महेश तेंडुलकर 
sakal

बोलून बातमी शोधा

Study Of New Found Inscriptions In Konkan Necessary Mahesh Tendulkar Comment

कोदवली (ता. राजापूर) येथील श्री शंकरेश्‍वर मंदिरातील दोन शिलालेखांची माहिती तेंडुलकर यांनी दिली. तेंडुलकर यांनी लिहिलेल्या "संस्कृत-मराठी शिलालेखांच्या विश्‍वात' या ग्रंथामध्ये शिलालेखांसंदर्भात बरीच माहिती दिली आहे.

कोकणात शिलालेख नव्याने आढळल्यास अभ्यास आवश्‍यक  :  महेश तेंडुलकर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणात अनेक शिलालेख दुर्लक्षित आहेत. ऊन, वारा पावसात ते झिजले आहेत. असे शिलालेख कोकणात कुठेही असतील तर ते वाचून, अभ्यासून लोकांसमोर मांडले पाहिजेत. ताम्रपट, नाणी ही जशी ऐतिहासिक अभ्यासाची साधने आहेत, तसेच शिलालेख आहेत. ते समकालीन व अस्सल विश्‍वसनीय पुरावे आहेत. परंतु ते सार्वजनिक ठिकाणी असल्याने दुर्लक्ष होत असून, आपण ऐतिहासिक ठेवा गमावत आहोत. हा ठेवा संरक्षित व्हावा, अशी भूमिका इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी मांडली. 

कोदवली (ता. राजापूर) येथील श्री शंकरेश्‍वर मंदिरातील दोन शिलालेखांची माहिती तेंडुलकर यांनी दिली. तेंडुलकर यांनी लिहिलेल्या "संस्कृत-मराठी शिलालेखांच्या विश्‍वात' या ग्रंथामध्ये शिलालेखांसंदर्भात बरीच माहिती दिली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 7 शिलालेखांचा उल्लेखही आहे. धूतपापेश्‍वर (राजापूर) आणि संघनाथेश्‍वर (लांजा) येथील शिलालेखांची माहिती त्यांनी स्वतः प्रसिद्ध केली आहे. एखाद्या गावातील ऐतिहासिक वास्तूवर असे शिलालेखही असल्यास त्याचा इतिहास अभ्यासकांना निश्‍चितच उपयोग होईल.

एखाद्या वास्तूचे आणि वास्तू ज्या गावात बांधलेली आहे, त्या गावाचे ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक महत्त्व कळू शकते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही गावात असले शिलालेख नव्याने आढळल्यास त्यांचा अभ्यास झाला पाहिजे, असे आवाहन तेंडुलकर यांनी केले. 

पुराभिलेख महत्त्वाचे 
लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून राहावा, म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची पद्धत होती. पुरातत्त्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात. शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.