पंचक्रोशीत दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर फसला  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

पावस, मेर्वी, नाखरे परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी बेहेरे टप्पा येथे अनेक दिवसांपासून दहशत पसरविणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातच बिबट्या फसला. बिबट्या पकडला गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 

पावस, मेर्वी, नाखरे परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत. हल्ले झाल्यावर वन विभागाने प्रयत्न करूनही बिबट्या पकडण्यात अपयशच येत होते. या परिसरात वन विभागातर्फे गस्त सुरू होती. मात्र, बिबट्या आपला मार्ग बदलून गावदरीतून भ्रमण करीत दिसून आला होता. रेस्क्‍यू टीमचे कॅमेरे व पिंजरे लावले तरी बिबट्या कुठेच आढळला नाही. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. 
आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात फसल्याचे निदर्शनाला आले. ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकारी प्रियांका लगड यांना दिली. लगड तत्काळ मेर्वीकडे रवाना झाल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी गर्दी करण्यास सुरवात केली. पिंजरा लावल्यापासून 55 व्या दिवशी मेर्वी, बेहेरे टप्पा येथे तो जेरबंद झाला. सकाळी चार-साडेचारच्या सुमारास बिबट्या अडकण्याची शक्‍यता आहे. त्या दरम्यान या सागरी मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. स्थानिक लोकांनाही ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने नदीच्या भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे लक्षात येताच तातडीने वन विभागाला कळविण्यात आले. वन विभागाचे अधिकारी सकाळी सातच्या सुमारास त्या ठिकाणी गेले. बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात आले. 

गेली दोन वर्षे या परिसरात सातत्याने बिबट्याने धुमाकूळ घालून माणसांसह पाळीव प्राण्यावर हल्ले करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यासह बिबट्याला गाडीत ठेवले. सकाळी पावणेदहाच्या दरम्यान वन विभागाची गाडी चिपळूणकडे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना झाली. त्यानंतर त्या बिबट्याला कोयना व्याघ्र संरक्षित भागात सोडण्याची शक्‍यता आहे. 

हे पण वाचाकाळ्या फुग्यांची कर्नाटक पोलिसांना धास्ती

बिबट्या जंगलात सोडणार 

बिबट्याला पकडल्यानंतर वन विभागाला थोडेसे हायसे वाटले. कारण, गेले 55 दिवस गस्तीच्या माध्यमातून बिबट्याला जेरबंद करण्याकरिता फिरत होते. असे असताना मेर्वी परिसरात चौघांवर बिबट्याने हल्ला केला होता. घटनास्थळी रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांना ग्रामस्थांनी बिबट्याला कोठे सोडणार, याबाबत विचारणा केली. या बिबट्याला आम्ही दोन जिल्हे सोडून संरक्षित जंगलात सोडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in capturing leopard in pawas ratnagiri