esakal | कोकणातील पारंपरिक उत्पादनांचा समावेश करत २५ जणांनी एकत्र येऊन बांबूपासून बनवली ‘नॅचरल बास्केट’
sakal

बोलून बातमी शोधा

success story Bamboo Natural Basket made by Organic Parshuram Agriculture Group pawas ratnagiri

पदार्थाएवढीच भावली ‘नॅचरल बास्केट’ची दिवाळी

सेंद्रिय परशुराम शेती गटाचे पाऊल; आगळावेगळा प्रयोग, मार्केटिंगही यशस्वी, १०० बास्केटची विक्री

कोकणातील पारंपरिक उत्पादनांचा समावेश करत २५ जणांनी एकत्र येऊन बांबूपासून बनवली ‘नॅचरल बास्केट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावस(रत्नागिरी):  कोरोनामुळे बाहेरच्या पदार्थांपेक्षा घरगुती उत्पादनांना मागणीचा कल लक्षात घेऊन ‘नॅचरल बास्केट’च्या माध्यमातून दिवाळी गिफ्ट संकल्पना रत्नागिरी तालुक्‍यातील पावस येथील सेंद्रिय परशुराम शेती गटाने प्रत्यक्षात आणली. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेतील जिल्ह्यातील हा आगळावेगळा प्रयोग असून त्याचे मार्केटिंगही यशस्वी झाले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘विकेल ते पिकेल’ योजना जाहीर केली. कृषिच्या आत्मा विभागाच्या सहकार्याने रत्नागिरीतील पावस येथील श्री परशुराम सेंद्रिय शेती गटाने आगळावेगळा उपक्रम राबविला. दिवाळीत मिठाई गिफ्ट देण्याची परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे बहुतांश लोकांनी बाहेरून विकत घेऊन अन्नपदार्थ खाण्यावर बंधने आणली. त्याचाच फायदा घेऊन ही आगळीवेगळी कल्पना अमलात आणली गेली. बचत गटातील २५ सदस्यांनी एकत्र येऊन बांबूच्या आकर्षक बास्केटचे पॅकिंग केले. त्याला गिफ्ट पेपर लावल्यामुळे झळाळी मिळाली. एका बास्केटमध्ये १० ते १२ पदार्थ ठेवण्यात आले होते. त्याची किंमत ७५० रुपये ठेवली. सरासरी २५ टक्‍के नफा यातील विक्रीतून झाला. कृषी विभागाचे मुंबई, ठाण्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याची खरेदी केली. १०० बास्केटच्या विक्रीतून ७५ हजार रुपये मिळाले. त्यातील नफा शेतकऱ्यांनी वाटून घेतला.

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित माल
पारंपरिक पद्धतीने दिवाळी भेट देण्याच्या संकल्पनेला छेद देऊन खास दिवाळी नॅचरल बास्केट तयार केले. त्यात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल व त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ समाविष्ट केले. काळीमिरी, काजूगर, कोकम सरबत, आंबा पल्प, हळद पावडर, कुळीथ पावडर, नाचणी पिठ, आमसुल, आंबा पोळी, लाल तांदूळ, जायफळ आदी कोकणातील पारंपरिक उत्पादनांचा समावेश केला. ही उत्पादने कशी वापरावीत, याची माहिती आहे.

रशुराम बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने उत्पादनं कशी घ्यायची, याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. कोकणी मेव्याचे मार्केटिंग करून उत्पन्नवाढीसाठी यंदा दिवाळी गिफ्टचा वेगळा प्रयोग यशस्वी केला.
- धनंजय जोशी, गटाचे प्रमुख

‘विकेल ते पिकेल’ योजनेतून ही संकल्पना राबविण्यात आली. सेंद्रिय उत्पादनांना मागणी असल्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला असून भविष्यात याच पद्धतीने सर्व गटांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- हर्षला पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा

संपादन- अर्चना बनगे

loading image