
पारधी कुटुंबाची वाटचाल ही कृषी यांत्रिकीकरणातून स्वयंपूर्णतेकडे सुरू आहे.
मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यात पडीक क्षेत्र वाढत असताना तीन एकरांवर विविध प्रकारच्या भाज्या, फळ लागवडीतून हमखास उत्पन्न घेणाऱ्या तुळशी गावातील पारधी कुटुंबाने स्वयंरोजगाराचा मार्ग निवडत यशस्वी वाटचाल केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे ब्रॅंडिंग तयार करून पॅटर्न राबविण्याचा संकल्प आहे.
शेतीत काय आहे, असं म्हणणाऱ्यांना आश्वासक शेतीचा वस्तुपाठ देताना सहा वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध प्रयोग, अभ्यासपूर्ण तंत्रशुद्ध लागवड यामुळे प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या उत्पन्नातून उत्तम अर्थार्जन निर्माण केले आहे. पारधी कुटुंबाची वाटचाल ही कृषी यांत्रिकीकरणातून स्वयंपूर्णतेकडे सुरू आहे.
हेही वाचा - सेंद्रिय परशुराम शेती गटाचे पाऊल; आगळावेगळा प्रयोग, मार्केटिंगही यशस्वी, १०० बास्केटची विक्री’ -
रामचंद्र पारधी यांनी अनेक क्षेत्रातील अनुभवानंतर आपली पावले शेतीकडे वळवली. मुलगे समीर, संदेश, पत्नी रोहिणी, सुना सृष्टी, साध्वी यांनीही यात स्वतःला झोकून दिले. समीर यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण व संदेशचा शेतीतील मेहनती वावर यामुळे अभ्यास आणि प्रात्यक्षिक याचा मेळ जुळून झाला. सगुणा राईस तंत्रज्ञानाचा वापर करून सतत तीन वर्षे विक्रमी भात उत्पादन घेतले. आलेल्या अडचणींना सामोरे जात भाजीपाला लागवडीतून आर्थिक उलाढाल वाढवली. तिलापिया जातीचा मत्स्यशेती प्रयोग केला.
दरवर्षी केलेली कलिंगड, पावटा लागवडीच्या विक्रमी विक्रीतून व्यवसायिकता रुजवली. शेतात उत्पादित झालेला माल श्रीसद्गुरू कृपा स्वयंसहाय्यता समूह तुळशी या बचत गटाच्या माध्यमातून शेतरस्त्याच्या शेजारी उभारलेल्या स्टॉलवर विकला जातो. यावर्षी अर्धा एकरवर कोथिंबीर, माट, पालक, मुळा, गवार, दीड एकरवर कलिंगड, एक एकरवर पावटा यांची लागवड केली आहे.
भाजीपाला शिजवून पर्यटक व खवय्यांना मेजवानी
अस्सल गावरान मेजवानीतून शेतातील भाजीपाला शिजवून पर्यटक व खवय्यांना दिला जातो. चुलीवरच्या चविष्ट जेवणाचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. शेतातील मालाला जागेवरच बाजारपेठ उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्च कमी झाला.
हेही वाचा - उपचार व्यवस्थित न केल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यु -
सोलरने वीज निर्मिती, पाणी मुबलक
उशालाच तुळशी धरण असल्याने पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला; मात्र शेतापर्यंत पाणी आणताना अनेक अडचणी आणि त्रास सहन करावा लागला. यावर उपाय म्हणून विहीर आणि मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून सोलरची कायमची उपाययोजना केली.
"व्यावसायिक दृष्टिकोनातूनच शेती करणे काळाची गरज आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ब्रॅंडिंग तयार करून पॅटर्न राबविण्याचा संकल्प आहे. रोजगाराचा अभाव असणाऱ्या तालुक्यात कृषी क्षेत्रात कुटुंब स्थिरावत गेले तर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहण्यास वेळ लागणार नाही."
- समीर पारधी, प्रगतशील शेतकरी
संपादन - स्नेहल कदम