पत्नी कागदपत्रे देत नसल्यामुळे जावयाने सासूच्या डोक्‍यावर व मानेवर कोयत्याने केले वार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

घरगुती कागदपत्रे त्याची पत्नी देत नसल्याने ती मिळावीत म्हणून तो सासूला सांगण्यासाठी आपल्या सासुरवाडीत २३ नोव्हेंबर रोजी सकाळी गेला.

गुहागर : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या डोक्‍यावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना गुहागर तालुक्‍यातील पालपेणे तळ्याचीवाडी येथे २३ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवेली रांजाणेवाडी येथील राजेंद्र काशिनाथ रांजाणे (४०) याला दारूचे व्यसन आहे. त्याची सासुरवाडी पालपेणे तळ्याचीवाडी येथे आहे. त्याची घरगुती कागदपत्रे त्याची पत्नी देत नसल्याने ती मिळावीत म्हणून तो सासूला सांगण्यासाठी आपल्या सासुरवाडीत २३ नोव्हेंबर रोजी सकाळी गेला. दरम्यान, त्याची सासू सुवर्णा नारायण टाणकर (५५) या घराला कुलूप लावून व शेजारी किल्ली ठेवून सकाळी ८.३० च्या सुमारास रेशनिंगवर धान्य आणण्यास गेल्या होत्या. त्या घरी आल्या व कुलूप उघडून घरामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांचा जावई मागच्या दाराने आतमध्ये येऊन बसल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी नशेमध्ये असलेल्या जावयाने मला कागदपत्रे देण्यास आपल्या मुलीला सांगावे, असे सांगितले. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी त्याने सासूच्या डोक्‍यावरील धान्याचे पोते फेकून दिले व तिचे तोंड दाबून हातातील कोयत्याने सासूच्या डोक्‍यावर, डाव्या कानाच्या पाठीमागे आणि मानेवर असे चार वार केले. त्यानंतर त्याने तेथील शेजारच्या लोकांना हा प्रकार सांगितला व पळून गेला. 
यावेळी शेजारील लोक जखमी सुवर्णा टाणकर यांना खासगी दवाखान्यात घेऊन गेले. तेथे प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी चिपळूण येथे घेऊन गेले. त्यांना अधिक त्रास झाल्याने तेथील डॉक्‍टरांनी अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यास सांगितले.

हेही वाचा - कणकवली रेल्वे स्थानकावरच प्रवाशांचे स्क्रीनिंग -

खासगी रुग्णवाहिका करून जखमी झालेल्या टाणकर यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. जावई राजेंद्र रांजाणे याला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक कदम करीत आहेत. सध्या चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारीपद रिक्त असल्याने अतिरिक्त चार्ज रत्नागिरी उपविभागीय अधिकारी वाघमारे यांच्याकडे आहे. त्यांनी गुहागर तालुक्‍यातील पालपेणे येथे येऊन या घटनेची माहिती घेतली व तपासकामी अधिक सूचना दिल्या.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sun in law attempt murder his mother in law in ratnagiri for domicile disputes