भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी संजू परब यांना उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारणीमध्ये संजू परब यांच्या नावावर एकमत झाले आहे.

कणकवली/सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अखेर संजू परब यांच्या नावावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी शिक्‍कामोर्तब केले. निवडणुक भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले. 

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार नितेश राणे, अशोक सावंत आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ""सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारणीमध्ये संजू परब यांच्या नावावर एकमत झाले आहे. या निवडणूकीत भाजप बहुमताने संजू परब यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.'' 

उमेदवारीबाबत बरेच दिवस चर्चा

सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजू परब यांच्यासह प्रभारी नगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक परिमल नाईक हे इच्छूक होते; मात्र सौ. कोरगावकर व संजू परब यांच्यात रस्सीखेच होती. कार्यकर्त्यामधुन संजू परब यांच्या नावाला अधिक पसंती होती तर कोरगावकर यांनीही पक्षाकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली होती; मात्र उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत बरेच दिवस चर्चा होती. तर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दोनच दिवसापुर्वी 8 तारिखला उमेदवारीची घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. याच पार्श्‍वभूमिवर कणकवली येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे यांनी उमेदवारीच्या चर्चेला पुर्ण विराम दिला. 

संघटना काैशल्यामुळेच उमेदवारी

परब हे नारायण राणे समर्थक असुन त्यांनी राणेंच्या स्वाभिमान पक्षाची तालुकाध्यक्ष पदाची धुरा पार पाडताना सावंतवाडी शहरासह तालुक्‍यात पक्ष वाढविला होता. विधानसभा निवडणुकीसाठी परब हे स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते; मात्र मध्यतंरीच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीत नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केल्याने परब यांच्या आशेवर पाणी फिरले होते. परब यांच्या अंगी असलेली काम करण्याची तळमळ व संघटन कौशल्य पाहता त्याच्या नावाची उमेदवार म्हणून पालिका निवडणुकीत पसंती असणे साहजिकच होते आणि हीच त्याची जमेची बाजू आजच्या उमेदवारीसाठी फायद्याची ठरली. परब यांनी 2016 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या तिकीटावर आठ नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी ते किंगमेकर ठरले होते. त्यावेळी परब यांनी आखलेली रणनिती यावेळीही चालल्यास परब यांना विजय सोपा जाणार आहे. 

कोरगावकर यांची उमेदवारी ठरणार डोकेदुखी

दुसऱ्या बाजूने विचार करता प्रभारी नगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर यांनी भरलेली उमेदवारी काहीशी डोकेदुखी होणार आहे. त्यामुळे पक्षाकडून सौ. कोरगावकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कोरगावर यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास परब हे त्याचे आव्हान कसे पेलणार हे सुद्धा निर्णायक ठरणार आहे. 

कार्यकर्त्यात उत्साह 

संजू परब यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावंतवाडी तालुक्‍यासह शहरातील कार्यकर्त्यात उत्साह संचारला असुन सर्वानी परब यांच्या प्रचारात झोकून देण्याचा निश्‍चय केला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunju Parab Candidate From BJP For Sawantwadi City President Election