esakal | शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना किसान क्रेडीटचा आधार; सात हजार जणांचे प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

Support of Farmer Credit to Fishermen Like Farmers Proposals Of Seven Thousand People

आतापर्यंत शंभर मच्छीमारांनी बॅंकांकडून कर्ज उचलली आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने किसान क्रेडिट कार्ड देण्याचे परिपत्रक काढले आहे. सागरी मच्छीमारांना ही योजना लागू केली आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठीही अर्थसाह्य मिळणार आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना किसान क्रेडीटचा आधार; सात हजार जणांचे प्रस्ताव

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी - शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. कोरोना कालावधीत नवीन हंगामात मच्छीमारी व्यवसाय कसा सुरु करायचा हा प्रश्‍न किसान क्रेडीटमुळे सुटला आहे. 

आतापर्यंत शंभर मच्छीमारांनी बॅंकांकडून कर्ज उचलली आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने किसान क्रेडिट कार्ड देण्याचे परिपत्रक काढले आहे. सागरी मच्छीमारांना ही योजना लागू केली आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठीही अर्थसाह्य मिळणार आहे. मंजुर रकमेतून गरजेनुसार रक्कम काढून वापर करावा आणि मासळी विक्री झाल्यास रक्कम भरायची असते. पुन्हा लागेल तेव्हा रक्कम उचल करता येते.

कर्जरुपात काढलेली रक्कम भरली की व्याज बंद होते. जेवढी रक्कम उचल करू, त्या रकमेवर 7 टक्‍के व्याज आकारले जाते. वेळोवेळी रक्कम भरल्यास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून व्याज माफ होते. यामुळे मच्छीमारांना बोटीची दुरुस्ती व नवीन जाळी खरेदी, इंजिन दुरुस्ती, पहिल्या ट्रीपला डिझेल, बर्फ आदींसाठी सावकार व मासळी व्यापाऱ्यांकडून रक्कम घ्यावी लागणार नाही. 

किसान कार्डसाठी इच्छुकांची यादी मच्छीमार सोसायटींकडून मागविली होती. जिल्ह्यातील 7 हजार मच्छीमारांनी प्रस्ताव मत्स्य विभागाकडे सादर केले. ती यादी कर्ज मंजुरीसाठी बॅंकांकडे पाठवली गेली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनेक मच्छीमारांना व्यावसाय सुरु करण्यासाठी पैशाची गरज होती. त्यातील शंभर मच्छीमारांनी किसान क्रेडीड योजनेतून कर्ज उचलली. मच्छीमारांची आर्थिक घडी कोलमडली होती.

हंगामाच्या सुरवातीला लागणारी गरज बॅंकांकडून मिळालेल्या या मदतीने भागली. यामध्ये मोठ्या नौकेला अडीच लाख तर छोट्या नौकेला दीड लाखापर्यंत कर्ज मिळते. हे लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती बॅंक ठरवते. सप्टेंबरला पर्ससिननेट मच्छीमारी सुरु होणार आहे, त्यांनाही किसान क्रेडिटचा आधार महत्त्वाचा ठरणार आहे. 

किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ मच्छीमारांना देण्यात येत आहे. त्यासाठी सोसायटींकडून यादी मागविली होती. ती यादी बॅंकांकडे देण्यात आली. मच्छीमार कर्जरुपात त्याचा लाभ घेत आहेत. हा कर्जप्रकार सीसी स्वरुपात आहे. 
- एन. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी. 

 
 

loading image