कृषी व पणन विभागाने वापरला असा फंडा : सोशल मिडीयावरुन विकणार असा आंबा.....

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 12 एप्रिल 2020

बाजार समित्या बंद होत असल्या तरीही आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कृषी व पणन विभाग वेगवेगळे फंडे वापरत आहे.

रत्नागिरी : बाजार समित्या बंद होत असल्या तरीही आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कृषी व पणन विभाग वेगवेगळे फंडे वापरत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकांशी संवादातून ग्राहक मिळवून दिले. मुंबई, ठाणे महापालिकेने आंबा खरेदी करायचा असेल तर या नंबरवर पत्र पाठवा, असे आवाहन वेबसाईट, व्हॉटस्‌ऍप, ट्‌वीटरवर केले आहे. त्याद्वारे गेल्या दोन दिवसात पनवेल, पालघर, कर्जतमध्ये पाच हजार बॉक्‍सची विक्री झाली. 

 रत्नागिरीतून पाच हजार बॉक्‍स रवाना

बागायतदार ते थेट ग्राहक अशी संकल्पना कृषी विभागाने राबवली. रत्नागिरी, राजापूर येथील बागायतदारांनी याचा फायदा उठवला. सातारा, कऱ्हाड, बारामतीपर्यंत आंबे पोचले. मुंबई, पुण्यात लॉकडाऊनमुळे आंबा विक्री अशक्‍य आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायटीत परजिल्ह्यातील लोकांना प्रवेशास मनाई आहे. त्यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सोसायटींशी चर्चा करुन आंबा विक्रीची साखळी तयार केली. किमान 100 बॉक्‍सची मागणी असेल त्यांना प्राधान्य आहे. डझनचा दर साडेतीनशे रुपये आहे. 

हेही वाचा- आंब्याच्या गाडीत  दिला चाकरमान्यांना आसरा अन्......

सोशल मिडीयाचा हापूस विक्रीला आधार
मुंबई, ठाण्यातील ग्राहकासाठी तेथील महापालिकांना विनंती केली होती. तसे पत्र कृषी विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ट्‌वीटरद्वारे मोठ्या गृहनिर्माण सोसायटींना पाठवले होते. त्यावर आंबा बागायतदारांचा मोबाईल नंबर होता. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ग्राहकांकडून आधी पैसे भरले गेले की, त्वरित बॉक्‍स पाठविण्यात येत आहेत. 

हेही वाचा- मंडणगडात पोस्टमन काका बनले वृद्धांचे श्रावणबाळ....
 
आंबा विक्रीसाठी शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात कृषी विभाग चांगले काम करत आहे; मात्र आंब्याचा दर ठरवण्याची जबाबदारी शेतकरी आणि ग्राहकांवर सोपवली पाहिजे. जेणेकरुन दर्जानुसार किंमत मिळू शकते. 
- सलिल दामले, आंबा बागायतदार  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support for the mango of social media sales kokan marathi news