
समुद्राच्या लाटांमध्ये असलेले मासे पकडण्याच्या क्रियेला सर्फ फिशिंग म्हटले जाते.
रत्नागिरी - भाट्येच्या लांबलंचक समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातून आलेले स्पर्धक सर्फ फिशिंगसाठी सज्ज होते. पंचांचा संदेश मिळताच अंगावर येणाऱ्या लाटांमध्ये फिशिंग लाईन भिरकावली. सर्वाधिक किलोची मासळी मिळवायची प्रत्येकालाच आस होती. सकाळच्या सत्रात एका स्पर्धकाचे नशिब झळकले आणि 10 किलो 410 ग्रॅमचा वागळी मासा लागला. तोच दिवसभरात सर्वाधिक किलोचा मासा पकडणारा सर्फ फिशिंगचा विजेता ठरला. पर्यटन वाढीसाठी हा प्रयोग निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
भाट्ये किनाऱ्यावर पर्यटनवाढीसाठी व स्पोर्ट फिशिंग असोसिएशन संचलित रत्नागिरी फिशर्स क्लबने आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय सर्फ टुर्नामेंटला उदंड प्रतिसाद लाभला. यात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, रायगड, पुणे, मुंबई व रत्नागिरीतील 80 स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी 7 वाजता स्पर्धकांनी फिशिंग लाईन पाण्यात फेकली. वाळूत रोवलेल्या रॉडला लाईन बांधून ठेवली. मासा गळाला लागला की रॉडच्या वरील बाजूला पाण्यात टाकलेली लाईन खालील बाजूने वाकु लागते. तोपर्यंत प्रत्येक स्पर्धक त्या रॉडकडे पाहत बसतो. अवघ्या दहा मिनिटात पहिला मासा मिळाला. त्यानंतर हळूहळू कुणाला अर्ध्या तासाने तर कुणाला तासाभराने मासे लागत केले. संयम राखत प्रत्येक स्पर्धक सर्वाधिक वजनाचा मासा पकडण्यासाठी दबा धरून होता; मात्र नशिब फक्त एकाच स्पर्धकाच्या बाजूने झुकले. स्पर्धकांच्या जाळ्यात प्रामुख्याने मोडोसा, गिटार फिश (खरा मासा), शिंगटी (कॅच फिश), वागळी, स्पॉटेड स्टींग्री या चार प्रमुख जातीचे मासे मिळाले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 20 हजारासह एकुण 45 हजार रुपयांची बक्षिसे रत्नागिरी शहरातील मांडवी येथील सुशील वारंगने पटकावली. तर मांडवीतीलच परिमल मायनाक यांनी द्वितीय क्रमांकोच 15 हजाराचे पारितोषीक मिळवत एकूण 35 हजार पटकाले. तृतीय 10 हजार रुपयांच्या बक्षिसासह एकूण 25 हजारची बक्षिसे अलिबागच्या संजीव पाटील यांनी मिळवले.
काय आहे सर्फ फिशिंग
समुद्राच्या लाटांमध्ये असलेले मासे पकडण्याच्या क्रियेला सर्फ फिशिंग म्हटले जाते. फिशिंग रॉड लाईनला हुक लावला जातो. त्याला लावलेल्या तारांना पुढे हुक असतो. त्यामध्ये मासा अडकतो. तो मासा काढून त्याचे वजन करुन पुन्हा समुद्रात टाकण्यात येतो.
सर्फ फिशिंग केरळ, तामिळनाडूमध्ये क्लबच्या माध्यमातून भरवली जाते. रत्नागिरीत पर्यटनवृध्दीसाठी निश्चित याचा उपयोग होऊ शकतो.
- गणेश चौगुले, आयोजक
संपादन - धनाजी सुर्वे