पर्यटनासाठी निघालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक नजर

  • सांगली येथून मोटारीतून गोवा येथे पर्यटनासाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू
  • प्रवीण राजाराम शिंदे (वय ४२, रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव
  • मृतदेहाचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन

बांदा - सांगली येथून मोटारीतून गोवा येथे पर्यटनासाठी निघालेल्या तरुणांच्या ग्रुपमधील प्रवीण राजाराम शिंदे (वय ४२, रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. त्यांचा मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून बांदा पोलिस अधिक तपास करत आहेत.

याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगली-वाटेगाव येथील तीन मित्र पर्यटनासाठी गोवा येथे जात होते. आज दुपारी तिघांनी एकत्रित कोल्हापूर येथे जेवण घेतले. त्यानंतर त्यातील प्रवीण शिंदे हे मोटारीतील मागील सीटवर झोपी गेले. बांद्या-दाणोली मार्गावर सरमळे येथे नवीन पोलिस तपासणी नाक्‍यावर बांद्या पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तपासणीसाठी मोटार थांबविली होती.

त्यावेळी तेथील सहायक पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी सीटवर झोपलेल्याला उठविण्यास सांगितले; मात्र त्यांची हालचाल न दिसल्याने ते मृत झाल्याचे निदर्शनास आले.
त्यांना तत्काळ बांद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले; मात्र त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. उद्या (ता. ५) सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title: Suspicious death of a youth in Banda Sindhudurg