कोलगावातील युवकाचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

सिंधुदुर्गनगरी -  कोलगाव कसेलवाडी (ता. सावंतवाडी) येथील रोहित रामचंद्र राणे (वय २४) याचा मृतदेह आज अणाव दाबाचीवाडी तलावात आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले; मात्र यामागे घातपात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्गनगरी -  कोलगाव कसेलवाडी (ता. सावंतवाडी) येथील रोहित रामचंद्र राणे (वय २४) याचा मृतदेह आज अणाव दाबाचीवाडी तलावात आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले; मात्र यामागे घातपात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. रोहित रविवार (ता. ७)पासून बेपत्ता होता, असे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे.

कोलगाव कसेलवाडी येथील रोहितने होडावडा (ता. वेंगुर्ले) येथील मामाच्या गावी स्वतःचे घर बांधले आहे. तो तेथेच राहायचा. तो पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मामाच्या मुलाची दुचाकी (एमएच ०७ - एडी ०१५७) घेऊन निघाला होता. मामाकडील लोकांना वाटले, की तो आपल्या वडिलांकडे म्हणजे कोलगाव कसेलवाडीला गेला असेल. वडिलांना वाटले तो मामाकडेच असेल.

आज सकाळी अणाव दाबाचीवाडी तलावाजवळ जनावरे घेऊन गेलेल्या व्यक्तींना एक मृतदेह तरंगताना दिसून आला. यानंतर शुभम राठीवडेकर याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर हा प्रकार रोहितचे वडील व मामाकडील लोकांना कळला.

रोहित, ओरोस आयटीआयकडील हॉटेल मॅनेजमेंटचा माजी विद्यार्थी आहे. तो काही दिवस पुणे येथे नोकरीला होता. सध्या तो होडावडा येथे मामाकडे बांधलेल्या घरात राहत होता. वडील कोलगाव येथील मूळ घरी राहून मोलमजुरी करतात. अणाव दाबाचीवाडी तलावाशेजारी रोहित याने आणलेली दुचाकी आढळून आली आहे. त्याच्यावर रोहित याने शूज, पॉकेट ठेवले होते. त्याच्या अंगावर मारहाण झाल्याचे कोणतेही व्रण आढळून आलेले नाहीत. रोहितचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर रोहितचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspicious death of a youth in Kolgaon