स्वाभिमानचा सिंधुदुर्ग पोलिसांवर धडक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज रवळनाथ मंदिर ओरोस ते जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात घडणाऱ्या बलात्काराच्या घटना, विनयभंग, अत्याचार सारख्या वारंवार घडणाऱ्या घटनांनी जिल्ह्याचे नाव बदनाम होत चालले आहे. येथे महिला असुरक्षित असल्याचेच हे संकेत आहेत. नुकतीच सावंतवाडीत सामुहीक अत्याचाराची घटना घडली. हा प्रकार गंभीर असल्याच्या भावना यावेळी व्यक्‍त करण्यात आल्या. 

आपल्या मागणीचे निवेदन अतिरिक्त पोलिस अधीक्षक निमित गोयल यांच्याकडे दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत, अस्मिता बांदेकर, सुमेधा पाताडे, दीपलक्ष्मी पडते, सायली सावंत, कल्पीता मुंज, संध्या तेरसे, मेघा गांगण, संजना सावंत, स्वाती राणे, प्राची तावडे, गीता परब, प्रज्ञा परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आंबोली सारखे नामवंत पर्यटनस्थळ खून, व्यभिचार यांनी बदनाम होत आहे. सावंतवाडीसारखे शांत सुसंस्कृत संस्थान आज अनेक घटनांनी ढवळून निघाले आहे. गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याच मतदार संघात जिल्ह्यातील सर्वाधिक गुन्हे, बलात्काराच्या घटना घडत आहेत. पोलिसांच्या साक्षीने खोट्या धाडी पडत आहेत. यात सावंतवाडीतील अत्याचार प्रकरणी म्हणजे कळस आहे. पालकमंत्री म्हणून आणि गृहराज्यमंत्री म्हणून केसरकर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारीशक्तीला पोलिस प्रशासनाकडून अपेक्षा आहे. निपक्षपणे या प्रकरणाचा तपास होवून आरोपींना शासन व्हावे. 
- प्रणिता पाताडे,
जिल्हाध्यक्षा स्वाभिमान महिला आघाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swabhiman agitation against Sindhudurg Police