T20 World Cup : टी-20 Cricket वर्ल्डकपमध्ये सट्टा ;महाविद्यालयीन तरुण, बेरोजगारांचे वाढले प्रमाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टी-20 Cricket वर्ल्डकपमध्ये सट्टा ; तरुण, बेरोजगारांचे वाढले प्रमाण

चिपळुणातील तरुण तसेच विद्यार्थीवर्ग या जुगारामागे ओढला जात असल्याने क्रिकेट सट्टा हा चिंतेचा विषय बनला आहे.

टी-20 Cricket वर्ल्डकपमध्ये सट्टा ; तरुण, बेरोजगारांचे वाढले प्रमाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : सध्या टी-२० क्रिकेट वर्ल्डकप (T20 World Cup)सुरू असून चिपळूणमध्ये (Chiplun) क्रिकेटवर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात आहे. सट्टेबाजीचा धंदा चिपळुणात जोरात सुरू झाला आहे. तालुक्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन तरुणांना क्रिकेट सट्ट्याचे वेड लागले आहे. पोलिसांना चकवण्यासाठी सट्टेबाज दररोज आपल्या जागा बदलत सट्टा खेळत आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातही सट्टेबाज अड्डा लावत असून याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

चिपळुणातील तरुण तसेच विद्यार्थीवर्ग या जुगारामागे ओढला जात असल्याने क्रिकेट सट्टा हा चिंतेचा विषय बनला आहे. चिपळुणात क्रिकेट सट्टा घेणारे बुकी तयार झाले आहेत. सुरुवातीला किरकोळ व्यवसाय करणारे हे बुकी आज कोट्यधीश झाले आहेत. हे बुकी एका ठिकाणी सट्टा लावत नाहीत. प्रत्येक वेळी जागा बदलली जाते. त्यामुळे तक्रार केली तरी कारवाई होत नाही, अशी पालकांची तक्रार आहे. क्रिकेट मॅच सुरू असताना सट्टा लावला जातो. सट्टा लावण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचा खिसा रिकामा व्हावा यासाठी सट्टा लावलेल्या ठिकाणी दारू, मटण आणि पत्ते खेळण्याचीही सोय केली जाते. त्यामुळे सट्टा आणि नशाबाजीचे ग्रहण चिपळूणला लागले आहे. शहरातील अनेक बंद फ्लॅटमध्ये सट्टा खेळला जात आहे.

सट्टा लावण्यासाठी चिपळूण शहरासह आजूबाजूचे जुगारी येतात. सामान्य लोकांपासून विद्यार्थी, व्यापारी, कंपनी मालक, कारखानदारांना सट्टा खेळण्यासाठी बसवले जाते. कोरोना महामारी सुरू असतानाही शहरातील हे क्लब सुरू होते. जुगार खेळणाऱ्यांची अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: आघाडी विरुद्ध भाजप ; विनय कोरे, प्रकाश आवाडेंमुळे वाढणार भाजपचे बळ

चिपळूणमधील तरुण पिढी सट्ट्याच्या आहारी जात आहे. याबाबत आम्ही पोलिसांना यापूर्वीच निवेदने दिली आहेत; मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. क्रिकेटवर सट्टा लावण्याचे प्रकार वाढले आहेत. तरुण पिढी यामध्ये बरबाद होत आहे. क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी.

- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण पंचायत समिती

loading image
go to top