झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

पालिका सभा; पाणीपुरवठ्यातील अनियमितता गाजली
झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

रत्नागिरी : शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर जनरेटर असूनही पाणी उचल का होत नाही, अशा समस्यांकडे भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. धरणावर झोपा काढणार्‍या पाणी विभागाच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करा, अशा सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पाणी विभागाच्या अभियंत्यांना केल्या आहेत. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. ती करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाला दिल्या.

पालिकेची आज तातडीच्या विशेष सभेनंतर लगेचच सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. सुरवातीलाच सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी पाणीपुरवठ्यातील समस्यांकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर राजू तोडणकर यांनी सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली जात नाहीत. तेथे पाण्याच्या आणि विजेची सोय नाही हा मुद्दा मांडला. नगराध्यक्षानी याबाबत गंभीर दखल घेतली. धरणावर अद्ययावत पंप आहेत. जनरेटरची व्यवस्था आहे तरीही वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाण्याचे पंपिंग का होत नाही, अशी पाणी विभागाकडे विचारणा केली. धरणावरील कर्मचारी झोपत असल्याने ही वेळ येत असल्याचे कळले. नगराध्यक्षांनी यावर मुख्याधिकारी व पाणी विभागाच्या अभियंत्यांना कर्मचार्‍यांवर कारवाई करा, असे आदेश दिले.

माळनाका येथील पालिकेच्या व्यायामशाळेजवळ असलेल्या चायनीज गाडीवर भांडणे होतात. तेथे दारू पिऊन धिंगाणा घातला जातो याकडे मागील सभेत ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर यांनी लक्ष वेधले होते. त्या वेळी सभेने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे समीर तिवरेकर यांनी स्पष्ट केले. या वेळी उपस्थित अधिकारी नंदकुमार मोहिते, पाटील यांनी त्या वेळी कारवाई करण्यास गेले असता ती हातगाडी स्वतःहून हलवतो असे सांगण्यात आले होते, असा खुलासा केला. मात्र ती गाडी अद्याप तिथेच आहे. आता तातडीने ती हातगाडी जप्त करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या.

बेघरांसाठी बांधलेल्या सदनिका

पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामांत अडथळा ठरणार्‍या कर्मचार्‍यांच्या रुम खाली करण्यात आल्या आहेत. या कर्मचार्‍यांना प्रथम पालिकेच्या मालकीच्या नाचणे रोडवरील बेघरांसाठी बांधलेल्या इमारतीतील सदनिका देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्या निकषात बसणारे अजून कोणी पुढे आलेले नाही. म्हणून पालिकेच्या त्या कर्मचार्‍यांना पालिकेच्या इतर ठिकाणच्या खोल्या देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे इमारतीतील सदनिका देण्यासंदर्भाचा सभेसमोरील विषय रद्द करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com