अतिक्रमणावर कारवाई करा, अन्यथा शिवसेनेने दिलाय `हा` इशारा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून अनधिकृत बांधकामे सुद्धा आहेत. प्रशासनाने पाठवलेल्या अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम नोटिसीबाबत बांधकाम करणारे काडीचीही किंमत देत नाहीत. मक्तेदारी हा फार्स ठरला आहे का? असा सवाल भोगटे यांनी उपस्थित केला आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर येत्या महिन्याभरात कारवाई झाली नाही, तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे नगरसेवक तुम्हाला कारवाई करण्यास भाग पाडतील व प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणतील. त्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावी, असा इशारा नगरसेवक गणेश भोगटे यांनी दिला आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून अनधिकृत बांधकामे सुद्धा आहेत. प्रशासनाने पाठवलेल्या अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम नोटिसीबाबत बांधकाम करणारे काडीचीही किंमत देत नाहीत. मक्तेदारी हा फार्स ठरला आहे का? असा सवाल भोगटे यांनी उपस्थित केला आहे.

शहरात गेल्या चार वर्षापासून बेकायदेशीर बांधकामे अतिक्रमणे नैसर्गिक स्तोत्रांमध्ये (ओहोळ, नदी-नाले ) अशा बांधकामांना ऊत आला आहे. वारंवार निदर्शनास आणूनही प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नक्की प्रशासनावर कोणाचा दबाव आहे? सत्ताधाऱ्यांचा की बांधकाम व्यावसायिकांचा? हे उघड झाले पाहिजे. कोरोना महामारीच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांपूर्वी अपुऱ्या यंत्रणेचे कारण पुढे देऊन कारवाई पुढे ढकलली जात आहे. या कोरोना महामारीच्या कालावधीत प्रचंड वाढ झाली आहे.

अपघाताची भीती वाढली आहे. यावर केव्हा कारवाई करणार? गेल्या चार वर्षांच्या कालावधीत शहरात विकासकामे झाली आहेत. त्यामध्ये काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे निदर्शनास आणून सुद्धा प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता ठेकेदारांची बिले सुद्धा अदा केलेली आहेत. निकृष्ट कामाच्या ठेकेदारावर कारवाई केली नाही, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे. 

पुढील दोन महिन्यात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अन्यथा विरोधी पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे नगरसेवक तुम्हाला कारवाई करण्यास भाग पाडतील व प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणतील, असा इशारा भोगटे यांनी दिला आहे. 

भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करा 
शहरात भटके कुत्रे व जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. याबाबत आवाज उठवूनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. पाच वर्षांपूर्वी चार वर्षाच्या मुलावर भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. अशा भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी श्री. भोगटे यांनी केली आहे. रस्त्यावर गुरे बसत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, याकडे सुद्धा श्री. भोगटे यांनी लक्ष वेधले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take Action On Encroachment Otherwise Shiv Sena Given A Warning