कातकऱ्यांच्या आयुष्यात अंधारच सोबती

भूषण आरोसकर
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

सौर कंदिलांचे वाटप
वस्तीत वीज नाही. यासाठी भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानकडून नुकतेच वस्तीतील कुटुंबीयांना बॅटरीवर चालणाऱ्या सौरकंदिलांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, गटविकास अधिकारी गजानन भोसले, ओंकार तुळसुलकर, संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी - डोक्‍यावर धड छप्पर नाही, कसण्यासाठी जमीन नाही, पिण्यासाठी पाण्याचा जवळपास स्रोत नाही, दिवसाची फक्त मोलमजुरी आणि जीवन मात्र अंधारात. अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व गावाच्या बाहेर माळरानाशेजारी असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाची कथा विकासापासून शेकडो कोस दूर असलेल्या मानवाची असल्याचे दिसून येते.

तळवणे खरीमध्ये कातकरी समाजाची पाच कुटुंबे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थायिक आहेत; मात्र त्यांना विकासाकडे घेऊन जाण्यासाठी गेल्या ५० वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीला आपला वेळ खर्ची घालणे आवश्‍यक वाटले नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यातच हा समाज शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे ग्रामपंचायत, महसूल शासन व शासकीय योजना याबद्दल काहीच व कोणतीच माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.

गावापासूनही हे आदिवासी कातकरी दूर वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्यासाठी फारसे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून झाले नाहीत. ही कुटुंबे दुसऱ्याच्या जमिनीत वास्तव्य करतात. त्यांची ज्याठिकाणी वस्ती आहे त्याच्या जमीन मालकाने पुनर्वसनासाठी दुसरी जागा देण्यासाठी तयारी दाखवली होती; मात्र त्याठिकाणी त्यांच्या पायाभूत सुविधांबाबत समस्या आणखी वाढण्याची भीती होती. तेथे शेजारी चिरेखाण असल्यामुळे रस्त्याकडे येण्याचा मार्गही बंद होऊ शकतो, असे त्यांना वाटते.

आता नावावर जमीन असती तर वीज व पाण्याची सोय झाली असती; मात्र नावावर जमीन नाही आणि जमिनीचा सातबारा नाही. यामुळे सर्व योजना रखडल्या गेल्या. पाण्यासाठी वस्तीतील लोकांना अडीच किलोमीटरपर्यंत पायपीट करण्याची वेळ येते. वन्य प्राण्यांची शिकार हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय; पण वन्य प्राणी हत्या करण्याचा गुन्हा असल्यामुळे या समाजातील स्त्री व पुरुषांपुढे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागविणे एवढाच पर्याय शिल्लक राहिला आहे. तेथील काही मुलांची नावे शाळेत घातली आहेत; मात्र शाळेत जाण्याबाबत त्यांच्यातही उदासीनता दिसून येते. वस्तीतील लोकांना स्वच्छतागृहे नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही तेवढाच गंभीर आहे. समाजापासून दूर असल्यामुळे समाजाशी जास्त संपर्कही नाही. 

सकाळ झाली की कुटुंबातील करती स्त्री व पुरूष मोलमजुरीसाठी बाहेर पडतात. म्हातारी माणसे घर सांभाळतात व शाळकरी मुले वस्तीतील झाडाखाली खेळतात. या समाजाचा विकास व्हायचा असेल तर लोकप्रतिनिधींकडून हालचाली व पाठपुरावा होणे आवश्‍यक आहे. गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून हा समाज येथे स्थायिक असून, गेल्या वीस वर्षापासूनही त्यांच्या समस्या अद्यापही जैसे थे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींबाबत मोठी नाराजी दिसून येते. 

एवढ्या वर्षांच्या कालावधीत कोणतेच प्रयत्न झाले नाहीत का, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. आधुनिक जगाचा विचार करता किमान नावावर जमीन, इतर मूलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी आता तरी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.

सौर कंदिलांचे वाटप
वस्तीत वीज नाही. यासाठी भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानकडून नुकतेच वस्तीतील कुटुंबीयांना बॅटरीवर चालणाऱ्या सौरकंदिलांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, गटविकास अधिकारी गजानन भोसले, ओंकार तुळसुलकर, संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talavane villages special story