तळकट दशक्रोशीचे तीस वर्षांचे पाणीदार स्वप्न अधुरेच 

शिवप्रसाद देसाई 
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

तळकट दशक्रोशीने (ता. दोडामार्ग) तीस वर्षापूर्वी छोट्याशा धरणाची शासनाकडून अपेक्षा बाळगली. त्याचा आजपर्यंत पाठपुरावा केला. तीन पिढ्या यासाठी संघर्ष उभा केला. अनेक पक्ष, नेते बहरले व मावळलेली; पण आश्‍वासनांपलिकडे काहीच मिळाले नाही. नारळ-पोफळी, काजू याच्या बागायतीतून सोने उगवण्याची क्षमता असलेल्या इथल्या तांबड्या मातीची तहान अजूनही भागलेली नाही. या संघर्षाचा घेतलेला हा वेध.. 

तळकट दशक्रोशीने (ता. दोडामार्ग) तीस वर्षापूर्वी छोट्याशा धरणाची शासनाकडून अपेक्षा बाळगली. त्याचा आजपर्यंत पाठपुरावा केला. तीन पिढ्या यासाठी संघर्ष उभा केला. अनेक पक्ष, नेते बहरले व मावळलेली; पण आश्‍वासनांपलिकडे काहीच मिळाले नाही. नारळ-पोफळी, काजू याच्या बागायतीतून सोने उगवण्याची क्षमता असलेल्या इथल्या तांबड्या मातीची तहान अजूनही भागलेली नाही. या संघर्षाचा घेतलेला हा वेध.. 

शेतीची जुनी व्यवस्था 
दोडामार्ग तालुक्‍यातील तळकट दशक्रोशी हा निसर्गसंपन्न भाग. असनियेपासून सुरू झालेला हा पट्‌टा कुडासे, कळणेपर्यंत पसरला आहे. नारळ, सुपारी ही येथील मुख्य पारंपारिक पिके. येथे सुपारीची लागवड साधारण साडेतीनशे वर्षापासून असल्याचे सांगितले जाते. पूर्वी पाणी नसलेल्या भागात काजू आणि पाणथळ जागेत नारळ-सुपारी असे पिकांचे गणित होते. इथली लोकसंख्याही पूर्वी कमी होती. त्यामुळे तुटपुंज्या पाणथळ जागेत होणारी बागायतीही पोटापुरतीच पुरायची. 

समीकरणे बदलली 
साधारण 50 वर्षापूर्वीपासून येथील बागायतीचे समीकरण बदलू लागले. येथे बागायती सोडून उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढू लागली. कुटुंबाचा विस्तार होवू लागला. यामुळे पाणथळ जागेवर होणारी बागायती अर्थार्जनाला अपुरी पडू लागली. सातबारावर मोठे क्षेत्र असले तरी तेथे पाण्याची सोय नव्हती. काजूला फारशी किंमत नव्हती. यामुळे नोकरीसाठीचे स्थलांतर वाढू लागले. 

धरणाची मागणी 
दुर्गम भागात असूनही येथे सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक आहे. आपल्याकडे डोंगरी व इतर पडीक क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. ही जागा लागवडीखाली आली तर बागायती बहरेल, हे इथल्या लोकांना साधारण 30-35 वर्षापूर्वी समजले. यातून धरणाची मागणी होवू लागली. याचे फलित म्हणून शिरवल येथे लघु पाटबंधारेचे धरण झाले; मात्र यामुळे शिरवल, कुंब्रल, भिकेकोनाळचा काही भाग ओलिताखाली आला. उर्वरीत भागाचा प्रश्‍न कायम राहिला. कालांतराने तिलारी धरण झाले. याचा कालवा कुडासेतून गेला. त्यामुळे तेली प्रश्‍नही मिटला; मात्र तळकट दशक्रोशीची तहान अद्याप भागली नाही. 

धरणासाठीचा संघर्ष 
तळकट दशक्रोशीने धरणासाठी अनेक नेत्यांचे उंबरठे झिजवले. यातून कोणत्या ठिकाणी धरण उभारावे, यावर खल सुरू झाला. भाईसाहेब सावंत आरोग्यमंत्री असताना या भागात हायड्रो प्रोजेक्‍ट असणारे धरण उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी झाली; पण त्यांच्या पश्‍चात हा प्रकल्प पुढे गेला नाही. ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या खासदारकीच्या काळात पुन्हा यासाठी प्रयत्न झाले. खडपडे-तळकटच्या दरम्यान यासाठीची जागा ठरविण्यात आली; मात्र या प्रयत्नांवर पुन्हा पाणी पडले. आता तर या क्षेत्रात वनजमिन व वनसंज्ञा असल्याने हा प्रस्ताव रद्‌दबातलच झाल्यात जमा आहे. यानंतर उडवणे या कोलझर ग्रामपंचायत हद्‌दीतील जागेत लघु धरणाचा प्रस्ताव पुढे आला. यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदवण्यात आली. त्यांनी सर्व्हेही केला; मात्र लाभक्षेत्राच्या निकषात हा प्रकल्प बसला नाही. यानंतर फुकेरी येथे जागेबाबत सर्व्हे सुरू झाला. 

तोंडचा घास गेला 
फुकेरी येथे दोनेखोल भागात धरण उभारणीचा प्रस्ताव होता. लघुपाटबंधारे विभागाने यासाठीचा सर्व्हे केला. तळकट भागाकडे येणाऱ्या नदीवर धरण बांधण्याचे निश्‍चित झाले. याचा फुकेरी, असनिये, झोळंबे, तळकट, कोलझर, उगाडे या गावांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होणार होता. याची निविदाही प्रसिध्द झाली होती; मात्र याच दरम्यान आघाडी शासनाचा सिंचन घोटाळा पुढे आला. याचे कारण दाखवून नव्याने प्रस्तावित धरण प्रकल्पांच्या निविदा रद्‌द करण्यात आल्या. यात फुकेरी धरणाचाही समावेश होता. दिर्घकाळ पाहिलेले स्वप्न शासनाच्या या एका निर्णयाने भंगले. 

धरणाच्या स्वप्नाचे पुनरूज्जीवन 
धरण रद्‌द झाले तरी स्थानिकांचे प्रयत्न सुरूच होते. सत्ताधारी, विरोधकांना निवेदने देण्यात आली. प्रचाराला येणाऱ्या प्रत्येक नेत्याकडे धरणाचे गाऱ्हाणे मांडले गेले. मुंबईकर चाकरमान्यांनीही आपापल्या परीने प्रयत्न सुरूच ठेवले. सिंचन घोटाळ्यानंतर शासनाने मोठे, मध्यम आणि लघु धरण प्रकल्पांना मंजुरी देण्यात हात आखडता घेतला. शासनाच्या जलसंधारण विभागाकडे मात्र निधी येत होता. याच्या माध्यमातून 100 हेक्‍टरवरच्या लाभक्षेत्रातील धरण कम तलाव बांधले जातात. या विभागामार्फत दोन वर्षापूर्वी फुकेरीचा पुन्हा सर्व्हे करण्यात आला. त्याचे अंदाजपत्रक बसवले गेले. 

नव्याने सर्व्हे 
जलसंधारण विभागाने फुकेरी दोनेखोल येथे जागा निश्‍चित केली. तिथपर्यंत कच्चा रस्ता करून बोअर व इतर प्रक्रिया केली गेली. यातून किती पाणीसाठा होईल, जमिन किती लागणार, प्रत्यक्ष धरणाची जागा, तेथील जमिनीचा दर्जा, दाब सहन करण्याची क्षमता आदींचा सविस्तर अभ्यास केला गेला. यात ही साईट जलसंधारणच्या प्रकल्पासाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे स्पष्ट झाले. 

कसा असणार प्रकल्प? 
जलसंधारण विभागाच्या सर्व्हेनुसार यासाठी साधारण 70 कोटीची गरज आहे. याच्या बुडीत क्षेत्रात वनसंज्ञा, खाजगी वने किंवा अडचणीची ठरेल, अशी जमीन नाही. शिवाय पुर्नवसनाची गरज भासणार नाही. फुकेरी गावच्या दोन डोंगरांच्या खोबणीत धरणाची जागा निश्‍चित करण्यात आली. यासाठीचा सांडवा साधारण 25 मीटरचा तर मुख्य धरणाचे बांधकाम 350 मीटरचे असणार आहे. अडीचशे हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल, इतकी याची क्षमता आहे. शिवाय नदीला वाढणाऱ्या पाण्यामुळे उगाडेपर्यंतच्या पाण्याची पातळी, नदी प्रवाहित राहण्याचा कालावधी वाढणार आहे. या धरणात अडीचशे सहस्त्र घनमीटर साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असणार आहे. लघुपाटबंधारे धरणाच्या निकषानुसार याला कालवा किंवा पाईपलाईनची तरतुद असणार आहे. यातून खालच्या गावांना शेतीसाठी थेट पाणी देता येवू शकेल, याचा सर्व्हे मात्र झालेला नाही; पण मूळ धरणात यासाठीच्या विमोचनाची तरतूद असणार आहे. शिवाय खालच्या गावांना पाण्याची गरज भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पाणी सोडण्याची तरतूद राहणार आहे. 

दुर्दैवाचे दशावतार सुरूच 
जलसंधारण विभागाने यासाठी आवश्‍यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र यासाठी आर्थिक तरतुद झालेली नाही. यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद येथील जलसंधारण महामंडळाकडे मंजुरीसाठी गेला होता; आर्थिक तरतुदीअभावी हा प्रस्ताव परत आला आहे. याच्या पूर्ततेसाठी राजकीय इच्छाशक्‍तीची गरज आहे. वास्तविक 70 कोटी ही मोठी रक्‍कम नाही; कोकणात जलसंधारणासाठी याआधी चांगले पैसे दिल्याचे कारण सांगत नव्या प्रकल्पांसाठी तरतूद करताना चालढकल सुरू आहे. यासाठी केवळ आश्‍वासनावर बोळवण करणाऱ्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

बदलेली गरज 
पूर्वी या भागात कच्चे बंधारे बांधून जलव्यवस्थापन केले जायचे. गेल्या 15-20 वर्षात प्रत्येकाने वीजेवरचे पंप लावून स्वतःची पाणी व्यवस्था केली. यामुळे पारंपारिक जलव्यवस्थापन अडचणीत आले. उपसा वाढला पण बंधारे बंद झाल्याने जलसंधारण थांबले. शिवाय लोकांनी बागायती क्षेत्रही वाढवले. पूर्वी काजूला पाणी दिले जात नसे; मात्र संकरित कलमांच्या लागवडीमुळे या बागायतीलाही पाणी लागते. यातून पाण्यासाठीची स्पर्धा सुरू झाली आहे. याचा परीणाम म्हणून एप्रिलपासून अनेक भागात पिण्याच्या पाण्याचीही चणचण भासत आहे. काही भागात पक्‍के बंधारे उभारले गेले; मात्र वेगवान प्रवाहामुळे हे बंधारे 8-10 वर्षेच पाणी साठवण क्षमता राखून ठेवतात. नंतर कुचकामी ठरतात. यामुळे या भागात लघुपाटबंधारेच्या धरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. केवळ फुकेरीचा नाही तर आणखी काही भागातही अशा प्रकल्पाची गरज आहे. ही वस्तुस्थिती असली तरी 30 वर्षापासून पाहिलेले धरणाचे स्वप्न पूर्ण होत नसल्याने स्थानिकांमध्ये कमालीचा आक्रोश निर्माण झाला आहे. याकडे राजकीय नेतृत्वाने गांभीर्याने पाहण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

फुकेरी धरण दृष्टीक्षेपात 

 • फुकेरी-दोनेखोल येथे दोन डोंगरांच्या खोबणीतील जागा निश्‍चित 
 • या छोट्या नदीला चौकुळ गावापासूनचे पाणी 
 • आताही ही नदी बारमाही प्रवाहित 
 • फुकेरी-झोळंबे-तळकट-कोलझर-उगाडे असा नदीचा मार्ग 
 • फुकेरी धरणासाठी 70 कोटीचा खर्च 
 • साडेतीनशे मीटरच्या बांधकामाची गरज 
 • ओलिताखालील क्षेत्राचे स्वरूप-250 हेक्‍टर 
 • पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा. 
 • नदीला गरजेनुसार पाणी सोडण्याची व्यवस्था 
 • भूसंपादन क्षेत्रात केवळ खाजगी, सार्वजनिक जागा 
 • पुर्नवसनाची गरज नाही 

""फुकेरी धरणाचा सर्व्हे करण्यात आला आहे. ही बेस्ट साईट आहे. याचा अहवाल व इतर प्रक्रिया पूर्ण करून वरिष्ठ पातळीवर पाठवली आहे. या धरण क्षेत्रात वनसंज्ञा, वन जमिनीचा प्रश्‍न नाही. शासनाची मंजुरी व आर्थिक तरतूद झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया आधी केली जाणार आहे. या धरणाचा परिसरातील गावांना मोठा फायदा होवू शकेल.'' 
- भुषण नार्वेकर, शाखा अभियंता, जलसंधारण विभाग. महाराष्ट्र शासन 

""फुकेरी धरण मंजुर झाल्याचे आमच्या ऐकिवात आहे. येथे येवून बोअर टेस्टींग व इतर सर्व्हे करण्यात आला. या धरणाचा दशक्रोशीला फायदा होणार आहे. यामुळे हे धरण लवकरात लवकर मंजूर करून पूर्णत्वास न्यावे.'' 
- ज्ञानेश्‍वर आईर, ग्रामस्थ फुकेरी 

""फुकेरी धरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील लोकांची मागणीही प्रखर आहे. जनरेट्यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल, याची खात्री आहे.'' 
- गणेशप्रसाद गवस, माजी सदस्य, दोडामार्ग पं.स. 

""पहिल्या टप्प्यात किमान धरणाचे काम पूर्ण करून पाणीसाठा झाला तरी चालेल. त्यामुळे नदी बारमाही प्रवाहित होईल. काहीही करून या धरणाचे काम लवकरात लवकर सुरू व्हायला हवे.'' 
- सुदेश देसाई, ग्रामस्थ कोलझर 

""अनेक वर्षे मागणी करूनही धरणाच्या कामात अडचणी येत आहेत. शासनकर्त्यांनी लोकभावनांचा विचार करावा. हा प्रकल्प व्हावा, अशी लोकांची तीव्र मागणी आहे. पुढच्या काळात या भागात पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. या लोकभावनांचा विचार व्हावा.'' 
- अरविंद उर्फ आपा देसाई, ग्रामस्थ कोलझर 

""आमच्या तीन पिढ्या धरणाची मागणी करत आहेत. आता तरी यावर तातडीने निर्णय घ्यावा. यंदा सर्वच गावात मेमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवली. बागायती सोडाच येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर बनणार आहे. याचा विचार करून हा प्रकल्प मार्गी लावावा.'' 
- देवेन देसाई, ग्रामस्थ, कोलझर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talkat Dashkroshi small dam issue