शेतकऱी समस्यांनी बेजार, जलसमाधीचाच इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आम्ही कर्जे काढून बियाणे, खत घेतले आहे. जर शेतात पाणी तुंबून राहिले तर शेती करायची कशी? अशी व्यथा या गरीब शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तळवडे बाजारपेठमधून जाणाऱ्या ओढ्याचा मार्गावर बंधारा घातल्याने याचा फटका तळवडे गावातील 40 ते 50 शेतकऱ्यांना बसला आहे. जवळपास 5 ते 10 एकर जमीन यामुळे पाण्याखाली गेली आहे. शेत जमिनीतून जाणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद केल्याने हा प्रकार घडला, असे मत शेतकऱ्यांचे आहे. वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊनही यावर ठोस निर्णय होत नाही. यावर 6 जुलैपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास 7 जुलैला जलसमाधी घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी दिला आहे. तसे निवेदनही त्यांनी दिले आहे. 

तळवडे बाजारपेठनजीक ओढा आहे; मात्र तळवडे बाजारपेठेच विस्तार होत असताना ओढ्याचा मार्ग बदलला. तसेच त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच आता पाण्याचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे पाणी आमच्या शेतजमीन व तलावडे बाजारपेठेमध्येही शिरत आहे. सद्यस्थितीत शेतीत पाणी तुंबून रहात आहे. आम्ही कर्जे काढून बियाणे, खत घेतले आहे. जर शेतात पाणी तुंबून राहिले तर शेती करायची कशी? अशी व्यथा या गरीब शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. 

तळवडे बाजारपेठेत व शेतीत ज्यावेळी पाणी तुंबले त्यावेळी प्रांताधिकारी सुशांत खाडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसीलदार प्रदीप पवार, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर आदींनी भेट दिली होती. यावेळी थोडा पाण्याचा मार्ग खुला केला; पण बांधकाम 8 फूट उंच असल्याने पाणी साचून राहिले. हा मार्ग तळवडे ग्रामपंचायतने खुला करावा, असे आदेश प्रांताधिकारी खांडेकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनास दिले; मात्र त्यांनी जबाबदारी झटकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

तत्काळ निर्णय घ्या 
पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकाऱ्यांनी यावर ठोस निर्णय न घेतल्यास 7 जुलैला या शेतजमिनीत जलसमाधी घेण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन तळवडे मागासवर्गीय शेतकरी अनिल जाधव, सगुण जाधव, सुरेश जाधव, गजानन जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, अरुण जाधव, वासुदेव जाधव, अशोक जाधव, अंकुश जाधव, धोंडी जाधव, सखाराम जाधव, चंद्रगुप्त जाधव, उमेश जाधव, मोहन जाधव, बाळकृष्ण जाधव, बापू जाधव, हरी जाधव आदींनी महसूल, पोलिस प्रशासन ग्रामपंचायत यंत्रणा यांना दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talwade farmers issue konkan sindhudurg