esakal | सिंधुदुर्गात खासगी शाळांतील शिक्षकांची घुसमट
sakal

बोलून बातमी शोधा

teachers are not getting salary in sindhudurg district

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांसह शिकवणी वर्ग बंद ठेवण्याच्या सूचना शासनाने काही महिन्यांपूर्वी दिल्या होत्या.

सिंधुदुर्गात खासगी शाळांतील शिक्षकांची घुसमट

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शाळा दीर्घकाळ बंद असल्यामुळे केवळ विद्यार्थी शुल्कावर चालणाऱ्या खासगी आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेकांना पगाराअभावी घर चालवणे अवघड बनले आहे. खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांचीही अशीच अवस्था आहे. 

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांसह शिकवणी वर्ग बंद ठेवण्याच्या सूचना शासनाने काही महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. राज्यभरातील शिक्षकांनी शिकवणी चालकांनी त्याला प्रतिसाद दिला; परंतु त्यानंतर राज्यभरातील लाखो शिक्षकांना लॉकडाउनमधील आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. शाळा बंद त्यात शिकवणीही बंद आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्‍न अनेकांसमोर निर्माण झाला.

शाळा आणि शिकवणी बंदी सरसकट केल्याने दोन ते तीन महिने इकडून तिकडून पैसे गोळा करून अनेकांनी आर्थिक तडजोड केली; परंतु पाच ते सहा महिन्यानंतर सध्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. जो-तो आर्थिक संकटात असल्याने मदत करायला कोणीही पुढे येत नाही आणि कोणाकडेही मदतही मागू शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यातच क्‍लासमध्ये मेहनत करून आर्थिक कमाई करायची म्हटली तर शिकवणी वर्गावर बंदी. क्‍लासेससाठी अनेकांनी भाडेतत्त्वावर रूम घेतल्या आहेत.

क्‍लास बंद असल्याने पाच ते सहा महिन्यांची रक्कम भरायची कशी? हा प्रश्‍न आहे. खासगी शाळांवरील शिक्षकांना जेमतेम 5 ते 7 हजारांपर्यंत मानधन दिले जाते. यातून दैनंदिन खर्च भागवायची कसरत असते. त्यातून बॅंक बॅलन्स करणे वगैरे लांबची बाब. त्यामुळे शाळेतील नोकरीच्या जोडीला शिकवणी वर्ग घेऊन अनेकजण आपला उदरनिर्वाह करतात. त्यातून कुटुंब चालवणारे लाखोजण राज्यात आहेत; मात्र कोरोनामुळे शाळाही बंद आणि शिकवणीही बंद झाल्याने आर्थिक संकट उभे आहे. 

पालकांकडून फी घेऊन अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान अनेक शिक्षकांनी पेलले आहे. पोटासाठी काहीही करण्याचा खटाटोप शिक्षकांकडून सुरू आहे; परंतु त्यातही काही संस्थाचालकांनी शिक्षकांची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळात 5 ते 10 हजारांपर्यंत मानधन असणाऱ्या या शिक्षकांच्या पगारात कपात केल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. काही संस्थाचालक तर केवळ 2 ते 3 हजार रूपये महिन्याला शिक्षकांना देतात. त्यातही दोन-दोन महिने पगारच दिला जात नाही, अशी स्थिती आहे.

लॉकडाउन काळात शाळा पूर्णत: बंद होत्या; मात्र अशा स्थितीत सरकारी शाळेत शिक्षक येत नसले तरी खासगी शाळेतील शिक्षक लॉकडाउनच्या अखेरच्या टप्प्यात वार्षिक नियोजन करण्यासाठी शाळेत येत असत. ऑनलाईन शिकवणीचा प्रयत्न अनेकांनी केला आहे; मात्र ऑनलाईन शिक्षणात मर्यादा येत आहेत. मोबाईल नसणे, मोबाईलला नेटवर्क नसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

ऑनलाईन शिक्षणाचा म्हणावा तसा परिणाम नसल्याने पालकही समाधानी नाहीत, असे शिकवणी चालकांचे म्हणणे आहे. जे शिक्षक अनुदानित शाळा, महाविद्यालयांवर काम करतात ते निश्‍चित आहेत; मात्र विना अनुदानित, खासगी शाळांवर काम करणाऱ्यांची मात्र परवड झाली आहे. शाळांमध्ये कमी मानधनावर अनेकांची कुचंबणा होत आहे. 

शिकवणी वर्गांना परवानगी मिळावी 
लॉकडाऊनमुळे आधीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने तसेच आर्थिक परिस्थिती मेटाकुटीस आल्याने शिक्षकांच्या दिव्याखालील अंधार विचारात घेऊन लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात शिकवणी वर्गांना नियम पाळून, स्थानिक स्थितीनुसार परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यभरातून जोर धरत आहे. 

शालेय अभ्यासक्रमाला पूरक अभ्यास म्हणून खासगी क्‍लासेसकडे पाहिले जाते. यावर डीएड, बी एडधारकांची उपजिविका आहे. कारण भरत्या बंद आहेत. तरी शासनाने यासाठी परवानगी द्यावी. 
- संकेत हर्णे, कणकवली 

 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top